होमपेज › Goa › इफ्फीत यंदा इस्राईल ‘कंट्री फोकस’

इफ्फीत यंदा इस्राईल ‘कंट्री फोकस’

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 1:00AM पणजी : प्रतिनिधी

राज्यात 20 ते   28 नोव्हेंबर 2017  दरम्यान होणार्‍या 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा  इस्राईल हा ‘फोकस कंट्री’  असेल, अशी माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी दिली. 

इफ्फीत यंदा इस्रायल देशातील दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना  मिळणार आहे.  गतवर्षी कॅनडा   ‘फोकस कंट्री’ होता. कॅनडातील  दर्जेदार चित्रपट इफ्फीत दाखविण्यात आले होते.  तसेच त्यापूर्वी  ब्राझिल, रशिया, चीन, दक्षिण अफ्रिका, स्पेन व दक्षिण कोरिया आदी  देशांची  ‘फोकस कंट्री’ म्हणून इफ्फीत गौरव झाला आहे. 

यंदा इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी  ‘भारतीय सिनेमात नवीन युगातील मनोरंजन’ हा विषय ठरविण्यात आला आहे.  यंदाच्या इफ्फीचा समारोप सोहळा  2019 या वर्षी होणार्‍या इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षावर आधारित असेल, अशी  माहिती सूत्रांनी दिली.  

यंदा इफ्फीत प्रख्यात इस्राईली अभिनेत्री व लेखिका गिला आल्मागोर यांना आंतरराष्ट्रीय ज्युरी या नात्याने आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच इफ्फी त अ‍ॅनिमेटेड चित्रपटांचा विशेष विभागही असेल. महानायक बिग बी अभिताभ बच्चन  यांच्यासोबत  यंदा विशेष सत्र असेल, अशी माहिती देखील मिळाली आहे. इफ्फीत अभिनेता रणबीर कपूर यांच्याशी विशेष संवाद सत्र होण्याचीही शक्यता आहे. 
दरवर्षीप्रमाणे यंदाही  इंडियन पॅनोरमामध्ये 26 फिचर फिल्मस् व 21 नॉनफिचर फिल्मस् दाखविण्यात येतील. ‘दंगल’ व ‘सिक्रेट सुपरस्टार’ या भारतीय चित्रपटांचे चीनमधील यश साजरे करण्यासाठी यंदाच्या 49 व्या इफ्फीत  खास सत्र आयोजित करण्यात येईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.   

गोवा मनोरंजन संस्थेकडून   इफ्फी ची तयारी जोमाने सुरू आहे.  इफ्फी दरवर्षीप्रमाणे गोवा मनोरंजन संस्था , आयनॉक्स आणि कला अकादमी येथे होईल.  इफ्फी संदर्भातील बैठका सध्या सुरू झाल्या आहेत. येत्या ऑक्टोबर पर्यंत इफ्फीत प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांबद्दल माहिती मिळण्याची शक्यता आहे.