पणजी : प्रतिनिधी
तांबडी माती सांतिनेझ-पणजी येथे भाड्याच्या खोलीत राहणार्या विष्णू उमाशंकर वर्मा (वय 30, उत्तर प्रदेश) याने पत्नी रूखसार पठाण (24) हिचा गुरुवारी चाकूने भोसकून खून केला.पत्नीच्या खुनानंतर आपल्या दहा महिन्यांच्या मुलाला घेऊन तो फरार झाला आहे. पणजी पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे.
पणजी पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सांतिनेझ परिसरात असलेल्या भाड्याच्या खोलीत एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याचा फोन पोलिसांना आला, त्यानुसार पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विष्णू व रूखसार यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ते कामानिमित उत्तर प्रदेशहून गोव्यात आले होते. संशयित पती विष्णूने गुरुवारी (दि.17) सकाळी पत्नी रूखसार हिच्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. खुनाचे कारण समजू शकले नाही. मात्र, काही साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू हा आपल्या लहान मुलाला घेऊन घरातून सकाळी जाताना दिसला होता, असे पोलिसांनी सांगितले.
खून करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केला आहे. रूखसारचा मृतदेह गोमेकॉ इस्पितळात शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. फरार विष्णू याचा शोध घेण्यासाठी राज्यातील बसस्थानके, रेल्वेस्थानकांना सतर्क करण्यात आले आहे, असे निरीक्षक शिरोडकर यांनी सांगितले.