Wed, May 22, 2019 06:50होमपेज › Goa › फोंड्यात त्रिशंकू, साखळीत सगलानी गटाची सरशी 

फोंड्यात त्रिशंकू, साखळीत सगलानी गटाची सरशी 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 12:45AMडिचोली : प्रतिनिधी

साखळी पालिका निवडणुकीत धर्मेश सगलानींच्या टुगेदर फॉर साखळी पॅनेलने पालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखून 13 पैकी 8 जागांवर विजय संपादित केला. त्यांनी समर्थन दिलेला एक उमेदवार व अन्य एकाने पाठिंबा दिल्याने सगलानी गटाचे संख्याबळ दहा झाले आहे. त्यामुळे आमदार डॉ. प्रमोद सावंत पुरस्कृत साखळी विकास मंचला जबर धक्‍का देऊन पुन्हा एकदा साखळी पालिकेवर सगलानी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

साखळीची निवडणूक धर्मेश सगलानी आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्यातच प्रामुख्याने होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. धर्मेश सगलानी, प्रवीण ब्लेगन, रियाज खान या त्रिकुटाने प्रभावी रणनीती आखून भाजपला रोखण्यात यश मिळवले.

प्रभागवार विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (पडलेली मते) : प्रभाग 1 : कुंदा माडकर (307) या दुसर्‍यांदा विजयी. प्रभाग 2 : यशवंत माडकर (202), प्रभाग 3 : शुभदा सावईकर (191), प्रभाग 4 : रश्मी देसाई (187), प्रभाग 5 : ज्योती ब्लेगन (326), प्रभाग 6 : राया पार्सेकर (198), प्रभाग 7 : ब्रम्हा देसाई (217), प्रभाग 8 : अन्सिरा रियाज खान (257), प्रभाग 9 : दामू घाडी (237), प्रभाग 10 : आनंद काणेकर (160), प्रभाग 11 : दयानंद बार्येकर (234), प्रभाग 12 : धर्मेश सगलानी (330), प्रभाग 13 : राजेश सावंत (349). धर्मेश सगलानी यांच्या टुगेदर फॉर साखळी पॅनलमधील आठ उमेदवार विजयी ठरले. तसेच शुभदा सावईकर यांना पाठिंबा दिला होता, त्याही विजयी झाल्या. यशवंत माडकर यांनी सगलानींच्या गटाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे सगलानी गटाचे संख्याबळ 10 झाले आहे.

चार विद्यमान नगरसेवक पराभूत

विद्यमान नगरसेवक निशा पोकळे, विभा देसाई, मिलिंद रेळेकर, उपेंद्र कर्पे या चौघांना पराभव पत्करावा लागला आहे. माजी नगराध्यक्ष आनंद नाईक, भारती नाईक यांनाही या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे. 

हा साखळीवासीयांचा विजय : सगलानी 

साखळी पालिका निवडणुकीत  जनतेने आम्हाला पूर्ण साथ दिली असून हा सर्व साखळीवासीयांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर धर्मेश सगलानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पूर्ण क्षमतेने साखळी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून भाजपने विकासाला सहकार्य करावे, असे आवाहनही सगलानी यांनी केले.

जनतेचा कौल मान्य : डॉ. प्रमोद सावंत

साखळीच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून काही ठिकाणी आमच्या उमेदवारांचा संपर्क कमी पडल्याने व काही उमेदवार नवखे असल्याने हा निकाल आल्याचे सांगून जे नगर पालिका मंडळ सत्तेवर येईल त्याला पूर्ण पाठिंबा राहील, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्‍त केली. विरोधकांनी काही प्रभागांत पैशांचा वापर केला व फायदा उठवला. मात्र, जे घडले त्याचा आपण स्वीकार केल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

विजयी उमेदवारांचा जल्‍लोष

टुगेदर फॉर साखळी पॅनेलच्या विजयी उमेदवारांनी साखळी पालिका क्षेत्रात मिरवणूक काढून विजय साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. 

डिचोली : प्रतिनिधी

फोंडा आणि साखळी नगरपालिकांच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन फोंडा पालिकेत ‘मगो’च्या रायझिंग फोंडा गटाचे 7, भाजपच्या नागरिक समितीचे 5 व काँग्रेसच्या फोंडा नागरिक प्रागतिक मंचचे 3 उमेदवार विजयी झाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. साखळी पालिकेत सगलानी यांनी पुन्हा एकदा पालिकेत वर्चस्व सिद्ध केले असून त्यांच्या नेतृत्वाखालील टुगेदर फॉर साखळी पॅनेलने 8 जागा जिंकल्या. तसेच त्यांनी समर्थन दिलेला एक उमेदवार विजयी झाल्याने व अन्य एकाने त्यांना पाठिंबा दिल्याने सगलानी गटाचे संख्याबळ 10 झाले आहे. एकंदर दोन्ही पालिकांच्या निवडणुकीत स्थानिक आमदारांच्या गटांना धक्‍का बसला असून मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे.

फोंडा : प्रतिनिधी

फोंडा पालिका निवडणुकीत ‘मगो’च्या रायझिंग फोंडा पॅनेलचे 7, भाजपच्या नागरिक समितीचे 5, काँग्रेसच्या फोंडा नागरिक प्रागतिक मंचाचे 3 उमेदवार विजयी झाल्याने पालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी या निवडणुकीत विजयासह हॅट्ट्रीक केली तर विश्‍वनाथ दळवी यांनी सलग दुसर्‍यांदा सर्वाधिक मतांसह विजय प्राप्त केला आहे. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मतमोजणीनंतर त्वरित पत्रकार परिषद घेऊन मगो व भाजपची युतीची घोषणा केली.

प्रभागवार विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (पडलेली मते) ः प्रभाग 1-अर्चना डांगी (226-भाजप), प्रभाग 2-विरेंद्र ढवळीकर (294-मगो), प्रभाग 3- यतिश सावकार (275-मगो), प्रभाग 4- चंद्रकला नाईक (303-भाजप), प्रभाग 5-व्यंकटेश उर्फ दादा नाईक (293-भाजप), प्रभाग 6-विलियम आगियर (393-काँग्रेस), प्रभाग 7-विश्वनाथ दळवी (598-भाजप), प्रभाग 8-प्रदीप नाईक (414-मगो), प्रभाग 9-सीमा फर्नांडिस (341-मगो), प्रभाग 10-शांताराम कोळवेकर (320-भाजप) , प्रभाग 11-रितेश नाईक (548-काँग्रेस), प्रभाग 12-जया सावंत (401-मगो), प्रभाग 13-अमीना नाईक (444-मगो), प्रभाग 14-आनंद नाईक (272-काँग्रेस), व प्रभाग 15 मधून गीताली तळवळीकर (238-मगो) हे 15 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. 

प्रभाग 1 मधील अर्चना डांगी व प्रभाग 3 मधील यतिश सावकार हे दोन उमेदवार प्रत्येकी 9  मतांच्या आघाडीने निवडून आले. तर प्रभाग 15 मधून गीताली तळावलीकर या केवळ 3 मतांच्या फरकाने विजयी झाल्या. विजयी  उमेदवारांनी वाहनांतून शहरात मिरवणूक काढली. तिस्क फोंडा सरकारी संकुलाच्या सभागृहात मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर  परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी यावेळी प्रभाग 4  महिलांसाठी राखीव असल्याने प्रभाग 5 मधून निवडणूक लढविली होती. प्रभाग 4 मध्ये आपल्या बंधूंच्या पत्नीला निवडणुकीत उतरवून दोन्ही जागा जिंकल्या. व्यंकटेश नाईक यांनी हॅट्ट्रिक केल्याने व त्यांची भावजयही विजयी झाल्याने ते पालिकेत नगराध्यक्ष निवडीसाठी महत्वाची  भूमिका बजावतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

प्रचारावेळी मागील पालिका मंडळ सर्वाधिक भ्रष्ट असल्याचा आरोप केल्याची आठवण करून दिल्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सध्या भाजप गटात निवडून आलेले सर्व नगरसेवक चांगले असल्याचे सांगितले. जे भ्रष्ट होते त्यांचा पराभव झाला असून फोंडावासीयांनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार असून केतन भाटीकर यांच्या सहाकार्याने फोंड्याचा विकास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
भाजपच्या नागरिक समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी सांगितले की, पालिका मंडळ स्थापनेसाठी भाजपचे वरिष्ठ नेते मगो पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करून युतीबाबतचा निर्णय घेणार आहेत. लोकांनी भाजपला दिलेला कौल मान्य आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सर्व आश्‍वासने पूर्ण करणार : ढवळीकर

बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायझिंग फोंडा पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले, तसेच जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. राज्यात भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड व दोन अपक्ष आमदारांचे सरकार सत्तेवर असून भाजपच्या मदतीने पालिका मंडळ स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. फोंड्यात ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन अस्तित्वात येणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी नव्या पालिका मंडळाचे सहकार्य घेणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. 

आश्‍वासने पूर्ण करा : रवी नाईक

आमदार रवी नाईक यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मतदारांना नोकर्‍या तसेच पाण्याच्या टाक्या देण्याची आश्‍वासने दिली. त्या आश्‍वासनांना मतदार बळी पडल्याने निकालात फरक दिसून आला. निवडणुकीच्या प्रचारावेळी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मागील पालिका मंडळ सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे आरोप केले होते. मात्र, भाजपच्या गटात मागील नगरसेवकांचा समावेश असून त्यांच्याच मदतीने आता ते पालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत, असेही ते म्हणाले. मतदारांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असून निवडणुकीपूर्वी मंत्र्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करावीत, असे आवाहनही आमदार रवी नाईक यांनी केले.