Tue, Jul 23, 2019 02:12होमपेज › Goa › हॉटमिक्स प्रकल्प होऊ देणार नाही

हॉटमिक्स प्रकल्प होऊ देणार नाही

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:05AM

बुकमार्क करा

थिवी : वार्ताहर

होळावणे थिवी-रेवोडा पंचायत क्षेत्रात होऊ घातलेल्या हॉटमिक्स प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार असून हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा थिवी आणि शिरसई ग्रामस्थांनी रविवारी होळावणे येथील सभेत दिला. या सभेत 200 ते 300 ग्रामस्थ उपस्थित होते. 

पर्यावरणप्रेमी रमेश गावस  म्हणाले, वजनदार व्यक्तीचा दबाव आणून, गावकर्‍यांमध्ये फूट पाडून प्रदूषणकारी प्रकल्प गावात आणला जात आहे. हॉटमिक्सचा प्रकल्प उभा राहिला तर येत्या पिढीला  कर्करोग, दमा तसेच इतर भयंकर आजारांना सामोरे जावे लागण्याची भीती  आहे. नायजेरिया सारख्या पाश्‍चिमात्य देशात असेे प्रकल्प लोकवस्तीपासून पाच किलोमीटर दूर उभे केले जातात. थिवी गावच्या लोकवस्तीपासून  फक्त 200 मीटर  दूर असून सरकारने या प्रकल्पाला कशी काय मान्यता दिली, असा प्रश्‍न गावस यांनी उपस्थित केला.

थिवीच्या आमदारांना तसेच थिवी पंचायतीला विश्‍वासात न घेता हा प्रकल्प उभा राहतोय, असे सांगून गावस यांनी  सेसा गोवा, आमोणा व नावेलीतील पिग आयर्न प्रकल्पामुळे ग्रामस्थांना होणार्‍या त्रासाची माहिती दिली. ग्रामस्थांनी एकसंध राहिल्यास हा प्रकल्प उभा राहणे कदापी शक्य होणार नाही. लोकांनी आपली ताकद सरकारला दाखवून द्यावी, मानवी आरोग्याला धोकादायक हा प्रकल्प हद्दपार करूया, असे आवाहनही  गावस  यांनी केले.

आमदार नीळकंठ हळर्णकर म्हणाले की, जळणार्‍या डांबरामुळे दुुगर्ंधी सर्वत्र पसरेल. काही मोजक्याच ट्रकवाल्यांना हा प्रकल्प हवा आहे. थिवी मतदारसंघात स्थानिकांनी जसा वस्तीलगत असे प्रकल्प आणण्यास   तीव्र विरोध दर्शविला आहे,तसाच  विरोध रेवोडावासीयांनी दाखवावा.

सभेनंतर थिवीचे उपसरपंच शिवदास कांबळी यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित प्रकल्प स्थळापर्यंत ग्रामस्थांचा मोर्चा नेण्यात आला. मोर्चात थिवी सरपंच तृप्ती शिंदे, पंच विठ्ठल वायंगणकर, सुनिता साळगांवकर, शर्मिला गडेकर, योगेश सातार्डेकर,अस्नोडा उपसरपंच पास्कोल डिसोझा    तसेच   200-300 ग्रामस्थ सहभागी झाले होते.