प्रतिनिधी : म्हापसा
कांदोळी येथे रॉयल मिराज या हॉटेलचे मालक विश्वजित सिंग (वय 41, रा. बामणवाडा कांदोळी व मूळ दिल्ली) याचा मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तलवारीने हल्ला करून खून करण्यात आला. या खून प्रकरणी कळंगुट पोलिसांनी उमेश राठोड (24, नेरूल) व दया शंकर (23, कळंगुट) या दोघा संशयितांना कर्नाटक पोलिसांच्या सहाय्याने गदग येथे अटक केली.
कांदोळीतील सन अॅण्ड सॅण्ड अपार्टमेंटच्या पार्किंगच्या जागी खुनाची घटना घडली. विश्वजित सिंग आपल्या रॉयल मिराज हॉटेलमधून फ्लॅटवर आले असता संशयितांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांना ठार मारले व इमारतीच्या सुरक्षारक्षकाला धमकावून घटनास्थळावरून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमी विश्वजित सिंग यास प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा पंचनामा पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केला. पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, उपअधीक्षक सेराफीन डायस, म्हापसाचे निरीक्षक तुषार लोटलीकर व हणजूणचे निरीक्षक चेतन पाटील यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली.
प्रत्यक्षदर्शी व सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे या खुनात उमेश राठोड व दया शंकर यांचा हात असल्याचे दिसून आले. चौकशीवेळी संशयित गदग-कर्नाटक येथे पसार झाल्याचे स्पष्ट होताच पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून संशयितांची माहिती दिली. या माहितीच्या आधारे कर्नाटक पोलिसांनी संशयितांना अटक केली. कळंगुट पोलिस संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गदगला रवाना झाले आहेत. कळंगुट पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूध्द भा.दं.सं.च्या 320 कलमाखाली खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.