Sat, Jun 06, 2020 23:20होमपेज › Goa › हॉस्पिसियोतील आग; चौकशीचे आदेश

हॉस्पिसियोतील आग; चौकशीचे आदेश

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 24 2018 12:37AMपणजी : प्रतिनिधी 

मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातील डायलेसिस विभागाला शुक्रवारी (दि.22) नेमकी कशामुळे आग लागली, याचा शोध घेण्यासाठी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली असून येत्या पंधरा दिवसांत या समितीकडून अहवाल मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

मंत्री राणे म्हणाले, नेमण्यात आलेल्या समितीत अतिरिक्त आरोग्य सचिव  डॉ. राजनंद देसाई, आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा, डॉ.डिसा या सदस्यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अनेकांकडून वेगवेगळी माहिती  आपल्याकडे आली असल्याने  कुणावरही आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. 

घटनेसंदर्भात चौकशी व तपास केल्याशिवाय आपण कुणावरही आरेाप करू शकत नाही. यासाठी अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीतून तथ्य शोधावे लागणार आहे. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार  आग लागलेल्या ठिकाणी स्टोव्ह मिळाला असून तेथे कुणीतरी वास्तव्य करत होते, असेही कळले आहे. अचानकपणे लागलेल्या या आगीमागचे कारण आपण शोधणार असून अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी दक्ष राहणार असून  लोकांच्या आरोग्याची हेळसांड होऊ देणार नाही, असेही राणे म्हणाले.  

डायलेसिस विभागाची स्थिती फार वाईट असल्याने रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला असता याठिकाणी इतक्यात तरी वीज पुरविणे धोकादायक ठरू शकते. अग्निशमन दलाकडून यासंदर्भात अहवाल मिळेपर्यंत या जागेत वीज पुरविली जाणार नाही, असेही राणे यांनी सांगितले.  

डायलेसिस विभागाच्या इमारतीचा दुसरा व तिसरा मजला  धोकादायक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जागा खाली करण्यासंदर्भात विभागाला 2013 साली कळविण्यात आले होते. मात्र, हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आम्ही यात काही करू शकत नसल्याचे राणे यांनी सांगितले. 

दरम्यान, हॉस्पिसियो इस्पितळाची शनिवारी आरोग्यमंत्री राणे यांनी पाहणी करून हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांच्याशी चर्चा  केली.  

डायलेसिस विभागात सुमारे 12 रुग्णांवर डायलेसिस उपचार  सुरू होते. या रुग्णांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करून त्यांच्या डायलेसिसची सोय इतर इस्पितळांत केली जाणार आहे. उत्तर गोव्यातील काही इस्पितळे दीनदयाळ  स्वास्थ्य सेवा योजनेशी जोडलेली असल्याने रुग्णांना तेथूनही डायलेसिस करता येईल. इस्पितळांमधून योग्य सहकार्य मिळत नसल्यास रुग्णांनी  थेट आपल्याशी संपर्क साधावा.
- विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री