Tue, Apr 23, 2019 19:49होमपेज › Goa › हॉस्पिसियोत प्रसूत महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ

हॉस्पिसियोत प्रसूत महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

दक्षिण गोव्यातील गोरगरीब जनतेसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या हॉस्पिसियो इस्पितळाची अवस्था दिवसेंदिवस मात्र ढासळत चालली आहे. नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांवर खाटेअभावी चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली असून दोन खाटा एकत्र करून तीन ते चार नवजात तान्हुल्यांना एकाच ठिकाणी झोपवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.    

काही महिन्यांपूर्वी हॉस्पिसियो इमारतीचा एक कठडा कोसळून पडण्याची घटना घडली होती. त्यानंतर हॉस्पिसियो प्रशासनाने महिला विभाग असलेला तीन मजल्याचा एक भाग बंद करून टाकला होता आणि या प्रभागातील रुग्णांना दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित केले होते. सध्या हॉस्पिसियोची क्षमता घटली असून रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. एक इमारत बंद झाल्याने इतर विभागावरील भारसुद्धा वाढलेला आहे.

हॉस्पिसियोचे जनसंपर्क अधिकारी सावर्डेकर यांनी सांगितले,की  प्रसूती विभागात एकूण 42 खाटा आहेत पण रुग्णांची संख्या पन्नास पेक्षा अधिक आहे.त्यात दर दिवशी नवीन रुग्णांची भर पडत असल्याने प्रसूती झाल्या नंतर रुग्णांना जास्त दिवस न ठेवता घरी पाठवले जात आहे.

 ‘सवेरा’च्या अध्यक्षा तारा केरकर यांनी सोमवारी हॉस्पिसियोच्या प्रसूती विभागाला भेट दिली असता खाटा जोडून तीन ते चार नवजात मुलांना एकाच ठिकाणी झोपविण्याचा प्रकार उघडकीला आला.खाटा नसल्याने नवजात अर्भकांवर एकाच ठिकाणी झोपवण्याची वेळ महिलांवर आलेली आहे.वीस पेक्षा जास्त महिलांची सिझेरियन पद्धतीने प्रसूती झालेली आहे.ऑपरेशनचे टाके अजून काढले गेले नसलेल्या आणि प्रसूतीला अवघे 48 तास उलटलेल्या माहिलावंर खाली जमिनीवर झोपण्याची पाळी आली आहे.

प्रसूती झालेल्या महिलांना विश्रांतीची गरज असते. हॉस्पिसियोत मात्र रूग्ण महिलांचे शोषण सुरू आहे,असे तारा केरकर म्हणाल्या .लहान मुलांना एकाच ठिकाणी झोपवले जाते.त्यांना एकमेकांचा संसर्ग होऊ शकतो. डॉक्टराना हे  सर्व माहिती असून सुद्धा ते काहीच न करता गप्प आहेत.प्रसूती झलेल्या महिलांना पाय सोडण्यासाठीही जागा शिल्लक नाही.प्रत्येक खाटेवर प्रसूती झालेल्या दोन महिला आणि दोन मुलांना ठेवण्यात आले असून सरकारने या प्रकाराची दखल घेऊन लवकरात लवकर नवे जिल्हा इस्पितळ सुरू करावे,अशी मागणी तारा केरकर यांनी केली आहे.

‘हॉस्पिसियोत महिला रुग्णांची अवहेलना’

लालन गावकर या महिलेने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले,की खासगी इस्पितळात सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करून प्रसूती करवून घेण्याची ऐपत नसलेल्यांना हॉस्पिसियोचा आधार आहे. मात्र इथे रुग्ण महिलांची अहवेलना होत आहे .प्रसूती मुळे खाली झोपणे शक्य नसलेल्या महिलांना दोन खाटा एकत्र करून झोपवले जाते.एकाच ठिकाणी तीन-तीन महिलांना झोपवले जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे.