Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Goa › राजकीय पक्षापेक्षा समाजाचे हित जपावे

राजकीय पक्षापेक्षा समाजाचे हित जपावे

Published On: Jan 16 2018 2:29AM | Last Updated: Jan 16 2018 2:20AM

बुकमार्क करा
होंडा : वार्ताहर

समाजाच्या विकासासाठी राजकीय पक्षापेक्षा समाजहित जपणे महत्त्वाचे आहे. समाजात मतभेद असले तरी चालतील पण मनभेद असू नयेत, असे प्रतिपादन कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले.   कला आणि संस्कृती  खाते, उटा संस्थेच्या सत्तरी आणि डिचोली  शाखेच्यावतीने  पिसूर्ले येथील गुरूदेव सभागृहात आयोजित केलेल्या आदिवासी लोककला महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री गावडे बोलत होते.  व्यासपीठावर अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, अनुसूचित जमाती महामंडळाचे अध्यक्ष दुर्गदास गावडे, गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्‍वास गावडे, उटा संस्थेचे अध्यक्ष नामदेव फातर्फेकर, रवींद्र गावकर, सूर्यकांत गावडे, उटाचे सत्तरी तालुका अध्यक्ष आनंद गावडे, भिरोंडा   सरपंच नितीन शिवडेकर, उटाचे महासचिव डॉ. उदय गावकर, नागू गावडे  आदी  उपस्थित होते.

मंत्री गावडे  म्हणाले, की समाज बांधवांनी विचाराचे जाळे विणून समाजाच्या विकासासाठी झटले पाहिजे. सर्वांनी संघटितपणे कार्यकेल्यास समाजाला  कोणीच रोखू शकणार नाही. मात्र त्यासाठी  विविध स्तरावरील राजकीय सत्ता असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.  परंतु त्यासाठी समाज बांधवांनी राजकीय आरक्षणाशिवाय राजकीय सत्ता हस्तगत करण्याची जिद्द ठेवून कार्य केले पाहिजे.  समाजासाठी सरकारच्या आदिवासी कल्याण खात्यातर्फे विविध योजना असून त्याचा फायदा  घेतला पाहिजे.  

प्रकाश वेळीप म्हणाले, की समाज बांधवांनी स्वाभिमानी जीवन जगले पाहिजे. यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची गरज आहे.  सध्या  समाजाला आदिवासी दर्जा मिळाला असला तरी अद्याप बरेच  विषय सोडवणे बाकी आहे, त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. दुर्गदास गावडे म्हणाले, की समाजाने संघटित राहून विकास साधला पाहिजे. तरच येणार्‍या काळात आदिवासी समाजाला चांगले दिवस येतील.  नामदेव फातर्फेकर, विश्‍वास गावडे, रवींद्र गावकर यांची  भाषणे झाली. केरळमधील  कनका स्वामी हिने आदिवासी समाजावर आधारीत तयार केलेल्या सीडीचे अनावरण  मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कुडणे येथील ज्येष्ठ  समाज कार्यकर्ते स्व. विनायक फाळकर यांना एक मिनिट शांतता  पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.   डॉ. उदय गावकर यांनी सूत्रसंचालन केले.  तर आनंद गावडे यांनी आभार  मानले. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.