होमपेज › Goa › होली स्पिरिट फेस्ताची फेरी ‘प्लास्टिकमुक्‍त’

होली स्पिरिट फेस्ताची फेरी ‘प्लास्टिकमुक्‍त’

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 12:28AM

बुकमार्क करा

मडगाव  ः प्रतिनिधी 

पालिकेच्या जागेत  होणारे होली स्पिरिट फेस्त प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय मडगाव पालिकेने  नुकताच घेतला होता.   त्यानुसार गेल्या पाच दिवसात फेस्ताच्या फेरीत फूड स्टॉल्स शिवाय पालिकेच्या आदेशानुसार कुठेच प्लास्टिक कचरा  दिसला नसल्याने  नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक व्यापारी फेरी प्लास्टिकमुक्त  रहावी यासाठी  आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. परिसर स्वच्छ  असल्याने   खरेदीसाठी फेरीत ग्राहकांनी गर्दी केली असून  विविध खाद्यपदार्थांचाही आस्वाद  आनंदाने घेताना दिसत आहेत. 

मागील आठवड्यात मडगाव होलीस्पिरिट फेस्त सुरू होण्याआधी  पालिकेने खास बैठक बोलाविली होती. त्यावेळी  पालिका मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस व नगराध्यक्षा  डॉ. बबिता प्रभुदेसाई, उपनगराध्यक्ष टिटो 

कार्दोज, व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व नगरसेवक व प्रशासनाने प्लास्टिकमुक्त फेस्ताच्या निर्णयाचे स्वागत केले होते. फेस्तात विकल्या जाणार्‍या कोणत्याही वस्तूच्या पॅकींगसाठी कुठेही प्लास्टिकचा वापर होत नाही, याची खात्री करण्यासाठी कंत्राटदारावर जबाबदारी सोपवल्याचे  डॉ. बबिता आंगले यांनी सांगितले होते. प्लास्टिकचा वापर करणार्‍याला दंड भरावा लागेल,असेही त्यांनी सांगितले होते. याच कारवाईच्या धाकाने फेरीतील विक्रेत्यांनी आपापल्या  प्लास्टिकचा वापर टाळला.

तयार कपडे विक्रेते, चप्पल विक्रेते, स्टील, बॅग विक्रेते, खेळणी, शोभेच्या वस्तू,  शृंगारसाहित्य   विक्रेते फेरीत मोठ्या संख्येत आहेत. त्यांनी आपल्या विक्रीच्या साहित्यावरील प्लास्टिक आवरण  काढले असून वस्तू कागदी वा कापडी  पिशवीतून  दिली जात आहे.  खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरसुद्धा हा नवीन नियम विक्रेत्यांनी कटाक्षाने पाळलेला असून केवळ द्रव पदार्थ जसे फळांचे ज्यूस, शेक याच स्टॉलवर प्लास्टिकचे ग्लास वापरले जात असून इतर खाद्यपदार्थांसाठी कागदी प्लेट्स ठेवल्या आहेत.