होमपेज › Goa › इतिहासकारांची बांधिलकी राजकीय पक्षांशी नको

इतिहासकारांची बांधिलकी राजकीय पक्षांशी नको

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:03AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

इतिहासाची मांडणी करणार्‍या इतिहासतज्ज्ञांनी किंवा इतिहासकारांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी  वा नेत्यांशी बांधील असू नये,असे प्रतिपादन ज्येष्ठ  इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी  केले. मॅकनिझ पेलेस येथे आयोजित 8 व्या कला आणि साहित्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात गुहा बोलत  होते.  व्यासपीठावर पत्रकार मिनी कृष्णन, दामोदर मावजो, यतीन काकोडकर व  हनुमान कांबळी उपस्थित होते. 

गुहा म्हणाले, बहुतांश भारतीय साहित्य  इतिहासावर आधारीत आहे. साहित्यात इतिहास हाच महत्त्वपूर्ण मुद्दा असून त्यानंतर समाजातील राजकारण, क्रीडा, संस्कृती व अन्य विषयांचा साहित्यात अंतर्भाव होतो. जगात कोणत्याही  गोष्टीची तुलना आपण  दीर्घकाळ जय किंवा पराभव अशी करू  शकत नाही.  वर्तमानत्र  समाजमनाचा आरसा असून समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सामान्य नागरिक वर्तमानपत्रांतून संवाद साधत असल्याने सध्या वर्तमानपत्र हे माध्यम साहित्य क्षेत्राचा  महत्वाचा पाया बनले आहे,असेही गुहा म्हणाले.

मिनी कृष्णन यांनी सांगितले,की गोवा राज्य हे संस्कृतीच्या दृष्टीने ‘मिनी इंडिया’ आहे. कला व साहित्य महोत्सवातून होणारी विचारांची देवाण घेवाण साहित्य व्यवहाराला चालना देणारी ठरेल.  

दामोदर मावजो म्हणाले, गोमंतकीयांचे  साहित्यावर  प्रेम आहे. महोत्सवात साहित्य प्रेमींच्या   आवडीच्या अशा सर्व विषयांवर साहित्यिकांची चर्चा  होणार आहे.उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  गोमंतकीय कलाकार हनुमान कांबळी यांनी तयार केलेल्या महोत्सवाच्या अधिकृत कलाकृतीचे प्रकाशन करण्यात आले. 

सलिल चतुर्वेदी यांच्या ‘ इन दि सेंचुरी ऑफ अ पोयम’ या पुस्तकाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महोत्सव 8 डिसेंबर रोजी इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा येथे होणार असून महोत्सवानिमित्त  देशविदेशातील कवी, लेखक एकत्र येणार आहेत.