Tue, Mar 26, 2019 01:48होमपेज › Goa › धर्मांतरबंदी कायद्यासाठी उद्या हिंदू चेतना यात्रा

धर्मांतरबंदी कायद्यासाठी उद्या हिंदू चेतना यात्रा

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:21PMपणजी : प्रतिनिधी

देशभरात एकूण सात राज्यांमध्ये धर्मांतरविरोधी  कायदा अस्तित्वात आहे.  गोव्यातही असा कायदा  करावा, या मागणीसाठी राज्यातील सर्व हिंदू संघटनांनी   20 मे रोजी ‘हिंदू चेतना यात्रे’ चे आयोजन केले आहे, अशी माहिती  गोमंतक हिंदू प्रतिष्ठानच्या पत्रकार परिषदेत जयेश थळी यांनी दिली. रविवारी शिवोली येथील स्वामी समर्थ मंदिराकडून दुपारी 3 वाजता यात्रेला सुरूवात होऊन पणजीत समारोप होईल,असे त्यांनी सांगितले.

थळी म्हणाले,  राज्यात  हिंदू जनतेत  बिलिव्हर्सच्या नावाखाली फूट पाडणार्‍या डॉम्निक दांम्प्त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा हिंदूंच्या भावना दुखावणार्‍या या घटनांना  आळा बसणे कठीण होऊन बसेल. राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असणे गरजेचे असून हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी स्वाभिमानी हिंदूंनी चेतना यात्रेत सहभागी व्हावे.प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर  म्हणाले,   रविवारी शिवोली येथून दुचाकी व चारचाकी वाहनांद्वारे  यात्रा काढण्यात येणार असून पणजी बसस्थानकावरील हनुमान मंदिराजवळ लहानशा सभेनंतर यात्रेचा याठिकाणी समारोप होईल. 

या यात्रेमागे राजकीय उद्देश असल्याची अफवा काही समाजकंटकांकडून पसरवली जात आहे. ही यात्रा निव्वळ सांस्कृतिक व सामाजिक चळवळ असल्याचे लोकांनी लक्षात घ्यावे. तसेच राज्यातील सर्व मंदिर  संस्थानांनी देखील यात्रेत भाग घेऊन बिलिव्हर्स च्या नावाखाली  फसलेल्या हिंदुंना पुन्हा जागे करण्यात हातभार लावावा, असे अवाहन वेलिंगकर यांनी केले.  प्रतिष्ठानचे सदस्य गोपाळ बंदिवाड म्हणाले, फाईव्ह पिलर्स चर्चमध्ये हिंदूचेे मोठया प्रमाणात  धर्मांतर करण्याचे  षडयंत्र डॉम्निक दाम्पत्यांने सुरू केले आहे. डॉम्निक दाम्पत्याविरोधात अनेक तक्रारी दाखल असून सरकारी अधिकार्‍यांवर याविषयी कारवाई होऊ नये,यासाठी दबाव आणला जात आहे. डॉम्निक दाम्पत्यांने अनेक कुटुंबे उध्वस्त केली असून शासनाने याविरोधात पाउल न उचलल्यास हिंदूंना कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.  पत्रकार परिषदेस भारतीय सुरक्षा रक्षा समितीचे सुनील सांतिनेजकर, भारत माता की जय चे विनायक तारी व रमेश नाईक उपस्थित होते.