Fri, Sep 21, 2018 03:37



होमपेज › Goa › राज्यात जोरदार पाऊस

राज्यात जोरदार पाऊस

Published On: Jun 10 2018 12:21AM | Last Updated: Jun 10 2018 12:16AM



पणजी : प्रतिनिधी 

राज्यात शनिवारी विविध ठिकाणी दिवसभर जोरदार पाऊस झाला. गेल्या 24 तासांत पणजीत सर्वाधिक पाच इंचाहून अधिक पावसाची नोेंद झाली आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्‍त केली. दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले.

राज्यात शनिवारी म्हापसा, काणकोण, दाबोळी, मुरगाव, केपे, पेडणे, सांगे व फोंडा भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. गोवा वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार शनिवारी संध्याकाळपर्यंत पणजीत पाच इंचाहून अधिक, म्हापसा व काणकोण येथे प्रत्येकी 5 इंच, दाबोळी, मुरगाव व केपे भागात प्रत्येकी 3 इंचाहून अधिक,  पेडणे, सांगे भागात प्रत्येकी 3 इंच, फोंड्यात 2  इंचाहून अधिक, एला (जुने गोवे) येथे 2 इंच,  साखळी भागात 1 इंचाहून अधिक तर वाळपई येथे 1 इंच पावसाची नोंद झाली आहे. 

पणजीतील कला अकादमी, मळा, कामराभाट, मिरामार सर्कल, डॉन बॉस्को सर्कल, पणजी बसस्थानक या भागात पावसाचे पाणी साचल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची धांदल उडाली.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. मेरशी येथे घरावर माड पडल्याने नुकसान झाले. कांपाल, पर्वरी, ताळगाव, दोनापावल, रायबंदर भागात पडझड झाली. भाटले येथे झाड वाहनावर पडले तर पणजी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दरम्यान, समुद्रात 45 ते 50 प्रतीतास वेगाने वादळी वारे वाहत असून वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने  येत्या 24 तासांत मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.