Thu, Apr 25, 2019 18:51होमपेज › Goa › सलग चौथ्या दिवशी राज्यात मुसळधार

सलग चौथ्या दिवशी राज्यात मुसळधार

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 12 2018 12:38AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यात सलग चौैथ्या दिवशी  मुसळधार पाऊस बरसला. गेल्या 24 तासांत  फोंड्यात सर्वाधिक चार इंचाहून अधिक पावसाची नोेंद झाली. विविध ठिकाणी पडझडीच्या घटना तसेच वीज पुरवठा खंडित होण्याच्या आणि वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटना घडल्या. पुढील चार दिवस राज्यात पावसाची रिपरिप कायम राहील, अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दिवसभर पेडणे, वाळपई, एला (जुने गोवे), साखळी, सांगे, सत्तरी, दाबोळी, मुुरगाव, पणजी, म्हापसा, काणकोण, मडगाव व केपे भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. गोवा वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सोमवारी संध्याकाळपर्यंत पेडण्यात 4 इंच, वाळपई येथे 3 इंच, एला (जुने गोवे) येथे 2 इंच, साखळी व सांगे भागात प्रत्येकी 1 इंचाहून अधिक तर दाबोळी व मुरगाव येथे प्रत्येकी 1 इंच  पावसाची नोंद झाली. 

पणजीत गेल्या 24 तासांत 2 सें.मी. इतका पाऊस पडला. पावसामुळे कला अकादमी, मळा, कामराभाट, मिरामार सर्कल, डॉन बॉस्को सर्कल, पणजी बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वार व पादचार्‍यांची मोठी धांदल उडाली. पावसामुळे शहरातील वाहतूक मंदावली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचेही  विविध ठिकाणी दिसून आले. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी पडझड झाली. पणजीत सांतइनेज, टोंक, मिरामार, सांतइनेज तांबडी मातीकडे, करंजाळे या ठिकाणांवर झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या. काही फांद्या विजेच्या तारेवर पडल्याने नुकसानही झाले, तसेच वीज खंडीत होण्याचे प्रकार घडले.   अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व ठिकाणांवर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दरम्यान, समुद्रात ताशी 50 ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहत असून लाटांची उंचीदेखील वाढणार असल्याने वादळाची तीव्रता वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे  समुद्र खवळलेला असून येत्या 24 तासांत मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.