Thu, Apr 25, 2019 21:55होमपेज › Goa › राज्यात संततधार सुरूच 

राज्यात संततधार सुरूच 

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 11 2018 1:05AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यात सलग तिसर्‍या दिवशी रविवारी विविध ठिकाणी दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गेल्या 24 तासांत 4 इंच पाऊस पडला  असून, मुरगावात सर्वाधिक 18 सें.मी.पावसाची नोेंद झाली. दरम्यान, पावसामुळे डिचोली, वाळपई, फोंडा आदी भागांत पडझडीचे प्रकार घडले. डिचोलीत धोकादायक झाडे कापण्यासाठी वीजपुरवठा दिवसभर खंडित करण्यात आला होता.

म्हापसा, काणकोण, दाबोळी, मुरगाव, मडगाव, केपे, पेडणे, सांगे व फोंडा भागांत जोरदार पावसाने रविवारी दिवसभर हजेरी लावली. गोवा वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रविवारी संध्याकाळपर्यंत पणजीत पाच इंचाहून अधिक, म्हापसा व काणकोण येथे प्रत्येकी 5 इंच, दाबोळी, मुरगाव व केपे भागात प्रत्येकी 3 इंचाहून अधिक, पेडणे, सांगे भागात प्रत्येकी 3 इंच, फोंड्यात 2  इंचाहून अधिक, एला (जुने गोवे) येथे 2 इंच,  साखळी भागात 1 इंचाहून अधिक तर वाळपई येथे 1 इंच पावसाची नोंद झाली आहे. 

पणजीतील कला अकादमी, मळा, कामराभाट, मिरामार सर्कल, डॉन बॉस्को सर्कल, पणजी बसस्थानक  परिसरात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास सोसावा लागला. विशेषतः दुचाकीचालकांची मोठी धांदल उडाली.अग्निशमन दलाने दिलेल्या, माहितीनुसार राज्यात रविवारी पडलेल्या  संततधार पावसामुळे  विविध ठिकाणी पडझड झाली. डिचोली तालुक्यात  साळ  येथे वृक्ष कोसळून बराच काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. चोडण  येथे विहिरीत पडलेल्या गाईला अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. लामगाव  येथे  भला मोठा पिंपळ  वृक्ष उन्मळून पडल्याने दोन घरांची सुमारे 50 हजारांची हानी झाली. आमोणा, मुळगाव आदी भागातही पडझड झाली असून डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले.

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे  प. बंगालसह बांगलादेश तसेच देशाच्या किनारी भागात वादळी स्थिती निर्माण झालेली आहे. समुद्रात 45 ते 50 प्रतीतास वेगाने वादळी वारे वाहत असून वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने  येत्या 24 तासांत मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

डिचोलीत वीज गायब; पाणीपुरवठाही ठप्प

रविवारी संपूर्ण दिवस डिचोली बाजार पथ व इतर परिसरात वीजपुरवठा बंद होता. धोकादायक वृक्ष कापण्यात आल्याने संपूर्ण दिवस पुरवठा बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पडोशे जलशुद्धीकरण प्रकल्पात शनिवारी रात्रीपासून वीज गायब झाल्याने पाणीपुरवठा खंडित झालेला असून, त्यामुळे डिचोलीवासीयांचे हाल झाले. 

खड्ड्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे 

पणजीतील नुकत्याच डागडुजी करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांतून खडी निघून गेल्याने खड्डे पूर्ववत झाल्याचे चित्र रविवारी दिसत होते. सांतिनेज चर्च  तसेच पणजी चर्च जवळील रस्त्यांवरील खड्डे काही दिवसांपूर्वीच खडी आणि मातीचा भराव टाकून पणजी मनपाने बुजवले होते. मात्र, सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे पडले. या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने  दुचाकी चालकांना वाहने चालवताना  कसरत करावी लागत आहे. याशिवाय बालभवनजवळील सखल भागात पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाल्याचे दिसत होते.

वातावरणात गारवा  

मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, रविवारी दिवसभर वातावरणात कमालीचा गारवा पसरला होता. राज्यातील कमाल तापमान 26.3 अंश सेल्सिअस तर किमान 22.6  अंश सेल्सिअस इतके आहे. वातावरणात 97  टक्के आर्द्रता आहे. येत्या 24 तासांत कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके कायम असेल.

‘डॉप्लर वेदर रडार’चे उद्या उद्घाटन

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी उपयुक्त ठरणारे ‘डॉप्लर वेदर रडार’ अल्तिनो पणजी येथील वेधशाळेत बसवण्यात आले असून, या रडारचे उद्घाटन मंगळवार दि. 12 जून रोजी दुपारी 3 वाजता भारत सरकारच्या भूगर्भ विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हवामान खात्याचे सरसंचालक डॉ.के. जे. रमेश यावेळी उपस्थित राहणार आहेत.