Tue, Dec 10, 2019 14:05होमपेज › Goa › पावसाच्या जोरदार सरी

पावसाच्या जोरदार सरी

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:34AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

‘ओखी’ चक्रीवादळामुळे  मंगळवारी पणजी, मडगावसह राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ढगाळ वातावरणासह सकाळी 6 वाजल्यापासूनच पावसाने हजेरी लावली. गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार बुधवार दि.6  रोजी देखील काही भागात पावसाची  शक्यता असून त्यानंतर वादळाचा प्रभाव ओसरण्याची शक्यता  व्यक्त केली  आहे. 

राज्यात पावसामुळे हवामानात गारवा पसरला असून मंगळवारी राज्यातील पणजी, मडगाव  दाबोळी, म्हापसा, पेडणे, जुने गोवे, मुरगाव आदी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. ऐन हिवाळ्यात पावसाचे आगमन झाल्याने लोकांसाठी त्रासदायक ठरले.

पावसामुळे मडगाव बाजारपेठेतील उलाढालही मंदावली शिवाय अनेकांनी घराबाहेरही जाणे टाळले. मडगाव नगरपालिकेने बाजारात ठेवलेल्या कचरापेट्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे  कलंडल्याने  बाजारपेठेत सर्वत्र कचरा पसरला.   

शहरात चालू असलेले सौंदर्यीकरणाचे काम व हॉली स्पिरीट फेस्ताच्या निमित्ताने कोलवा  सर्कल जवळ पालिकेच्या मोकळ्या जागेवर चालू असलेले फिलींगचे कामही मंगळवारी रखडले. शहरात फातोर्डा, अंबाजी, आर्लेम आदी ठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम बंद ठेवण्याची वेळ आली.  

समुद्रात  45 ते 50 कि. मी. प्रति तास वेगाने वारे वाहत असून वार्‍याचा वेग वाढून 60 कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता आहे. ‘ओखी’ वादळाच्या धोक्यामुळे पुढील 48 तास मच्छीमारांना खोल समुद्रात न उतरण्याचा इशारा गोवा वेधशाळेने दिला आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळपासून वाहत असलेेल्या वादळी वार्‍यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. या वादळामुळे किनारी भागातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.