होमपेज › Goa › साखळी प्रभाग फेररचनेसंदर्भात आज सुनावणी

साखळी प्रभाग फेररचनेसंदर्भात आज सुनावणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

केरी : वार्ताहर  

साखळी नगरपालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेसंदर्भातील प्रकरणावर मंगळवार दि. 3 रोजी सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.साखळी पालिकेची निवडणूक गोवा निवडणूक आयोगाने यापूर्वीच दि. 6 मे रोजी जाहीर केली आहे. प्रभागात वाढ करताना प्रभागांची संख्या 11 वरुन 13 केली आहे. 13 प्रभागांपैकी महिला व इतर मागासवर्गीयांसाठी प्रत्येकी 4 म्हणजेच एकूण 8 प्रभाग राखीव ठेवण्यात आले असून 5 प्रभाग खुल्या गटातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आले आहेत. परंतु, प्रभाग फेररचना, राखीवता बेकायदेशीर असल्याचा आरोप करुन साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. यात  सरकार, पालिका प्रशासन व गोवा निवडणूक आयोगाला प्रतिवादी केले आहे.

साखळीचे आमदार तथा सभापती डॉ.प्रमोद सावंत व साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून राजकीय संघर्ष जारी आहे. त्याचा विपरित परिणाम साखळी पालिकेच्या विकासावर होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. पणजी नंतर मास्टर प्लान चा मान साखळी शहराला मिळाला होता. साखळीच्या मास्टर प्लान चा आराखडाही तयार आहे. परंतु, आमदार व नगराध्यक्ष यांच्यामधील असमन्वय व संघर्षामुळे हा मास्टर प्लान रेंगाळत पडला आहे.

आमदार व नगराध्यक्ष आपापली जबाबदारी झटकून एकमेकांना दोष देऊन साखळी पालिकेला विकासापासून वंचित ठेवत असल्याच्या चर्चाही होत आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीतही डॉ. प्रमोद सावंत व सगलानी हे दोघेही एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. यासंदर्भात प्रमोद सावंत म्हणाले की, मागच्या पालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला कौल दिला होता. परंतु, पैशांच्या बळावर भाजपचे नगरसेवक विकत घेऊन काहींनी गैरमार्गाने सत्ता चालवली.आता पालिकेला पुन्हा ‘सी’ ग्रेडवर आणून विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न काहींनी चालवला असल्याचेही ते म्हणाले.

प्रभाग संख्या कमी करुन साखळी पालिकेवर पुन्हा एकदा आपल्या मर्जीच्या लोकांची वर्णी लागावी यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. जनता अशा षड्यंत्राला बळी पडणार नाही. यंदाच्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही सभापती यावेळी म्हणाले. पालिकेच्या विकासाची सरकार व आमदार डॉ.प्रमोद सावंत यांना काळजी असती तर त्यांनी साखळी पालिकेला दुय्यम वागणूक दिली नसती, असे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी सांगितले. 14 मुख्याधिकारी, तीन लेखापाल, तीन अभियंते बदलून पालिका अस्थिर करण्याचे षडयंत्र रचण्यात आले.   साखळी पालिकेचे स्वीकृत सदस्य असताना दर वेळी बैठकीची नोटीस पाठवूनही एकाही बैठकीला आमदार या नात्याने सभापती का उपस्थित राहिले नाहीत? असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  पालिकेचा दर्जा सुधारावा, असे आपल्यालाही मनापासून वाटते. परंतु, ज्यापद्धतीने बेकायदेशीर प्रभाग फेररचना करण्यात आली, त्याला आपली हरकत आहे.साखळी पालिकेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग संख्या वाढवणे अशक्य आहे. ते पुढे म्हणाले की, डिचोली पालिकेलासुद्धा ‘बी’ ग्रेड मिळाला आहे. परंतु, पालिकेच्या प्रभागांची फेररचना करण्यात आलेली नसून प्रभाग संख्या अकराच आहे, असेही सगलानी म्हणाले. 

Tags : Goa, Goa News, Hearing, today, regarding, relocation, chain wing


  •