Thu, Apr 25, 2019 07:34होमपेज › Goa › वीज घोटाळा खटल्याची तीन मेपासून सुनावणी

वीज घोटाळा खटल्याची तीन मेपासून सुनावणी

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी  

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचा कथित समावेश असलेल्या  वीज घोटाळ्याप्रकरणी खटल्याच्या सुनावणीस 3 मे पासून उत्तर गोवा सत्र न्यायालयात सुरुवात होईल. त्यानुसार उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायाधीश इरशाद आगा यांनी बुधवारी मंत्री गुदिन्हो यांच्यासह अन्य सहा संशयितांना या खटल्यावेळी उपस्थित राहण्याचे  निर्देश दिले.

वीज घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आरोप निश्‍चिती करण्यासंदर्भातील निर्देश रद्द करावेत,  ही गुदिन्हो यांनी केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने 17 जानेवारी रोजी फेटाळून लावली होती. 

सर्वोच्च  न्यायालयाने यावेळी उच्च न्यायालयाच्या आरोप निश्‍चिती संदर्भात दिलेले निर्देश रद्द न करता गुदिन्हो यांना दिलासा देण्यास नकार दिला. तत्कालीन सरकारमध्ये वीजमंत्री असलेले माविन गुदिन्हो यांच्या विरोधात  कोट्यवधी रुपयांच्या वीज घोटाळ्याप्रकरणी आरोप निश्‍चित करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबर 2007 रोजी दिला होता. या आदेशाला त्यांनी  सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तत्कालीन  विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी  गुदिन्हो विरोधात या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.