Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Goa › गुदिन्होंविरोधातील वीज घोटाळा प्रकरणी आजपासून सुनावणी

गुदिन्होंविरोधातील वीज घोटाळा प्रकरणी आजपासून सुनावणी

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांचा कथित  संबंध असलेल्या वीज घोटाळ्याच्या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (दि.15) उत्तर गोवा सत्र न्यायालयात सुरू होणार आहे. वीज घोटाळा प्रकरणी  आरटीआय कार्यकर्ते  अ‍ॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी  हस्तक्षेप याचिका दाखल  केली आहे. या हस्तक्षेप याचिकेवरील युक्‍तिवाद  15 जून रोजी ठेवण्यात आला आहे.

2001 सालच्या कोट्यवधी रुपयांच्या वीज घोटाळा प्रकरणातील संशयित मंत्री गुदिन्हो व अन्य सहा जणांना गुरुवारी सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु गुदिन्हो हे वैयक्‍तिक कारणास्तव  हजर राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. त्यानुसार न्यायाधीश  इरशाद  आगा यांनी गुदिन्हो यांना पुढील सुनावणीवेळी न चुकता हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

तत्कालीन  सरकारमध्ये  वीजमंत्री  असलेले  माविन गुदिन्हो  यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या वीज घोटाळ्याप्रकरणी आरोप निश्‍चित करावे, असा आदेश उच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबर 2007 रोजी दिला होता. या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र,  सर्वोच्च न्यायालयाने 17 जानेवारी रोजी गुदिन्हो यांची ही याचिका फेटाळून लावली होती. तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गुदिन्हो विरोधात या घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.