Thu, Apr 25, 2019 07:30होमपेज › Goa › खासगी डॉक्टरच्या हल्ल्यात आरोग्य संचालक जखमी

खासगी डॉक्टरच्या हल्ल्यात आरोग्य संचालक जखमी

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:47AMपणजी : प्रतिनिधी

आरोग्य खात्याचे संचालक संजीव दळवी यांच्यावर लोखंडी रॉडने  हल्ला करून त्यांना  व्यंकटेश आर. या खासगी डॉक्टरने जखमी केल्याच्या घटनेने गुरुवारी  खळबळ उडाली. यात डॉ. दळवी यांच्या डोक्याला इजा झाली.  या घटनेनंतर तेथील कर्मचार्‍यांनी हल्लेखोराला टॉयलेटमध्ये कोंडले. मात्र   त्याने  टॉयलेटच्या खिडकीतून खाली उडी मारल्याने त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. दोन्ही जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. 

संशयित डॉ. व्यंकटेश हे  खासगी डॉक्टर असून ते मडगाव येथील हॉस्पिसिओ इस्पितळात डायलेसिस विभाग चालवतात. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना  दुपारी  दीड  वाजण्याच्या सुमारास  घडली. संशयित डॉ. व्यंकटेश  याने  आरोग्य खात्याच्या कार्यालयात जाऊन संचालक  डॉ. दळवी यांच्याकडे ते हॉस्पिसिओ इस्पितळात चालवत असलेल्या डायलेसिस  विभागाची   प्रलंबित  बिले कधी फेडणार, असा प्रश्‍न केला.  डॉ. व्यंकटेशने त्याच्यासोबत केरोसिन तसेच लोखंडी रॉडही आणला होता. प्रलंबित बिलांवरून दोघांमध्ये वाद झाला व त्याचे  पर्यवसान  डॉ. दळवी यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ल्यात झाल्याचे सांगण्यात आले.  

या हल्ल्यात डॉ. दळवी यांच्या डोक्याला मार बसल्याने त्यांच्या  शर्टवरदेखील रक्त सांडले. डॉ. दळवी यांनीदेखील हल्ल्यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळच्या गोंधळ, आरडाओरडीमुळे खात्याचे कर्मचारी डॉ.दळवींच्या केबिनकडे धावून आले व त्यांनी संशयित डॉ.व्यंकटेशला पकडून टॉयलेटमध्ये  कोंडले, त्यावेळी त्याने टॉयलेटमध्ये  केरोसिन ओतले. तसेच पहिल्या मजल्यावर असलेल्या  या  टॉयलेटच्या खिडकीतून खाली उडी मारली. यात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून   त्यालाही गंभीर इजा झाली आहे. सदर घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी संशयित डॉ. व्यंकटेश याला ताब्यात घेऊन  पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर 108 रुग्णवाहिका बोलावून त्यालाही उपचारासाठी  गोमेकॉत पाठवण्यात आले. दरम्यान, संशयित  डॉ. व्यंकटेश याने सरकारकडे त्यांची सुमारे 70 लाख रुपयांची बिले प्रलंबित असल्याचे सांगितले. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.