होमपेज › Goa › मेगा शिबिराद्वारे ग्रामीण भागात आरोग्य जागृती

मेगा शिबिराद्वारे ग्रामीण भागात आरोग्य जागृती

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 11:14PMवाळपई : प्रतिनिधी 

वय वाढल्यावर ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यावर अनेक  समस्या निर्माण होतात. गोवा राज्य  आरोग्य खात्यातर्फे ग्रामीण भागात मेगा आरोग्य शिबिर आयोजित केले ही खरोखरच चांगली बाब आहे. या शिबिरामुळे  ग्रामीण भागातील लोकांत  आरोग्याविषयी जागृती  निर्माण होईल, असे  प्रतिपादन  माजी मुख्यमंत्री  तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी केले. 

सत्तरी तालुक्यातील म्हाऊस पंचायत क्षेत्रात आरोग्य खाते गोवा सरकार, गोवा मेडिकल कॉलेज, गोवा डेंटल कॉलेज व म्हाऊस पंचायत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मेगा आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राणे बोलत होते. जिल्हा पंचायत सदस्य  फटी  गावकर, आरोग्य खात्याचे सहसंचालक डॉ.डिसा, डॉ. दिलीप आमोणकर , डॉ. सुरेखा पुरुळेकर, मनोज प्रभुदेसाई ,वाळपई आरोग्यधिकारी  डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. रिधिमा, डॉ चित्रे ,डॉ. आयडा,  विनोद शिंदे,  उपसरपंच अशोक गावकर उपस्थित होते.  शिबिरात  वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणी करण्यात आल्या असून 470 जणांनी शिबिराचा लाभ घेतला. 

प्रतापसिंह राणे म्हणाले, की अशा प्रकारची  आरोग्य शिबिरे ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.  आरोग्य खात्याने आपल्या सुविधा ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविल्या आहेत. अशा शिबिराचा लोकांनी  पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. फटी गावकर म्हणाले, की  ग्रामीण भागात मेगा आरोग्य शिबिर आयोजित करणारे गोवा हे   पहिले राज्य आहे.  शिबिराचे सारे  श्रेय आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना जात आहे . अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत  ग्रामीण भागातील आठ हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी  करण्यात आली.  आरोग्य तपासणीत रोग आढळून आलेल्या रुग्णांवर  पुढील उपचार सुरू आहेत. 

डॉ. डिसा म्हणाल्या, की  ग्रामीण भागातील जनतेला  आरोग्य सुविधेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी  मेगा आरोग्यशिबिर आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे. देवयानी गावस यांनी स्वागत केले. उदय सावंत यांनी  सूत्रसंचालन केले. बाळकृष्ण सावंत यांनी आभार मानले. 

मोफत चष्मे प्रदान करणार 

मेगा आरोग्य शिबिरात तपासणी करण्यात आल्यानंतर रुग्णांना  मोफत औषधे वितरित करण्यात आली . तसेच गरजू रुग्णांना  आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या सहकार्याने मोफत चष्मे प्रदान करण्यात येणार आहेत, अशी  माहिती  उपसरपंच अशोक गावकर यांनी दिली.