होमपेज › Goa › एफडीएचे नियम पाळा; अन्यथा निवेदनाला केराची टोपली : राणे

एफडीएचे नियम पाळा; अन्यथा निवेदनाला केराची टोपली : राणे

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 10 2018 1:12AMपणजी : प्रतिनिधी

घाऊक मासळी विक्रेता संघटनेने  एफडीएने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आधी पालन  करावे  आणि त्यानंतर सरकारकडे  सूचना कराव्यात. सदर संघटनेच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या जाणार नसून त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित  राणे यांनी सांगितले. 

राणे म्हणाले, की सदर संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम मौलाना सरकारला निवेदनाद्वारे अनेक सल्ले देत असल्याबद्दल आपल्याला आश्‍चर्य वाटत आहे. आयात  मासळीची तपासणी  करण्यासाठी कोणाला नेमावे हे त्यांचे सांगणे संयुक्‍तिक नाही. एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणार्‍या माणसाला सरकारला उपदेश करण्याचा कोणताही हक्क नाही. 

एफडीए चे नियम न पाळता मासळी संघटना निवेदने देत राहिल्यास  त्या  निवेदनांचे तुकडे करून केराच्या टोपलीत टाकली जातील.   सरकारचे कायदे न पाळणार्‍यांशी आपण बोलणी वा चर्चा करण्याचाही कोणताही प्रश्‍न उद्भवत नाही. आधी एफडीए च्या सूचनांचे पालन  करा, व त्यानंतरच   बैठक घेऊया. असे सांगून हा माणूस आपल्याला आपण काय करावे, याविषयी कसे काय सांगू शकतो?, राज्याचा मंत्री म्हणून आपल्या अधिकारात काय ते करणार आहे,असे राणे यांनी सांगितले.