होमपेज › Goa › मडगावात मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण   

मडगावात मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण   

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 31 2018 12:15AMमडगाव ः प्रतिनिधी

येथील  लॉयोला हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनीइयत्ता आठवीत शिकणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन विध्यार्थ्याला शिक्षा म्हणून जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या विद्यार्थ्याला हॉस्पिसियो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुख्याध्यापक बासिलिओ वेगो यांच्याविरोधात मडगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

मडगाव पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक वेगो यांच्याविरोधात कलम 323, 506(2) तसेच गोवा बाल कायदा कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या विद्यार्थ्याच्या वर्ग शिक्षकाने त्याला वर्गाबाहेर काढले होते. त्याच दरम्यान वेगो त्याठिकाणी आले व त्यांनी त्याला जबर मारहाण केली. या संदर्भात इस्पितळात भरती असलेल्या विद्यार्थ्याची जबानी नोंदवण्यात आली आहे.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार ही घटना शनिवारी (दि. 27) घडली. पाचव्या तासाला शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून वर्गात गुडघ्यावर बसवले व आपल्या मुलाला वर्गाबाहेर घालवले होते. त्यावेळी मुख्याध्यापक वेगो तिथे आले व त्यांनी आपल्या मुलाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.आपल्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारले, तोंडावर मुक्के लगावले तसेच केसांना पकडून भिंतीवर त्याचे डोके आपटले. या मारहाणीत आपल्या मुलाच्या तोंडाला, मानेला आणि डोक्याला जबर मार लागला. मारहाण होतेवेळी तास संपल्याची बेल वाजली त्यामुळे त्याला आणखी मारहाण झाली नाही. जबर मारहाणीमुळे आपला मुलगा शाळेत झोपला.

या तक्रारीची प्रत दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव, तसेच शिक्षक संचालकांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले की, अद्याप उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्याचा वैद्यकीय दाखला मिळालेला नाही. या प्रकाराची चौकशी सुरू आहे.

मुलाला विश्‍वासात घेतल्याने सत्य घटना कथन

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ही मारहाण होताना शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि वर्गशिक्षिकेने पाहिले आहे. मारहाण झाल्यानंतर मुलाला प्राथमिक उपचार देण्यात आले नाहीत. मारहाणीमुळे आपला मुलगा बराच हादरला होता. त्यामुळे त्याने ही घटना घरी सांगितली नाही. सोमवारी अंतर्गत दुखण्याने आणि लाजेने तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने घडलेली घटना कथन केल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.