Thu, Apr 25, 2019 07:53होमपेज › Goa › हरवळे धबधबा चार दिवसांत पूर्ववत 

हरवळे धबधबा चार दिवसांत पूर्ववत 

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

हरवळे धबधबा पुन्हा प्रवाहित  व्हावा, यासाठी राज्याच्या जलस्रोत खात्याकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. साखळीच्या आसपास असलेल्या सुमारे चार खाण कंपन्यांनी खाणीतील पाण्याचा उपसा करून ते प्रवाहात सोडण्यास सुरुवात केली असून चार दिवसांत हरवळे धबधबा पुन्हा पूर्ववत प्रवाहित होईल, असे साखळीचे आमदार तथा सभापती प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

पर्वरी येथे गुरुवारी सभापती सावंत यांनी जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांच्यासह खात्याचे मुख्य अभियंता, खात्याचे सचिव व अन्य अधिकार्‍यांची बैठक घेतली.  सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदी आदेशामुळे राज्यातील खाण व्यवसाय ठप्प झाला असला तरी खाणीत साठलेल्या पाण्याचा उपसा करण्याची सूचना खाण खात्याने सर्व खाण मालकांना दिली आहे. हरवळे धबधब्याकडे जाणारे सर्व प्रवाह पूर्णत: बंद झाले असून ते पूर्ववत करण्यासाठी सोनशीपासून होंड्यापर्यंतच्या भागातील खाणींमधील पाण्याचा उपसा केला जाणार आहे. यासाठी सेझा गोवा, फोमेंतो, साळगावकर आणि केणी या खाण कंपन्यांनी येत्या 30 मे पर्यंत तरी पाणी उपसा सुरू ठेवण्याची  तयारी असल्याचे खात्याला कळवले आहे, असे सावंत यांनी सांगितले. जलस्त्रोत मंत्री पालयेकर यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत खात्याच्या अभियंत्यांना राज्यातील सर्व खाणींतील पाण्याचा नियमीतपणे उपसा होतो की नाही याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. खाणी जवळील गावांना आणि शेतीला किती पाणी लागेल, याची माहिती संकलित करण्यास सांगितले असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

Tags : Goa, Harvale, waterfall, four days