होमपेज › Goa › सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा

सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:01AMहरमल   :   वार्ताहर 

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा. इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलद्वारे मिळणार्‍या सुखनैव योजनांकीत सेवा ही  स्वतःचे नुकसान करून घेणारी घातक प्रक्रिया आहे.त्याचा अतिरेक होणे म्हणजेच आपल्या भवितव्याची चिंता वाढवण्याचे कारण होय. त्यासाठी सोशल मीडियाचा गरजे पुरताच वापर करून विद्यार्थी दशेत अभ्यासावर अधिक भर देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी केले.   

हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेतर्फे ’सायबर क्राईम’ विषयावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते पोलिस अधीक्षक कश्यप बोलत होते. संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर, गणपत पार्सेकर कॉलेजचे प्राचार्य उदेश नाटेकर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोविंदराज देसाई, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर आदी उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक कश्यप म्हणाले, की सायबर क्राईम म्हणजे नकारार्थी गोष्टींचा स्वीकार करून चुकीच्या  मार्गांचा अवलंब करणे होय. यासाठी विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेला बळी पडण्यापेक्षा त्याचा वापर चांगल्यासाठी करावा. सोशल मीडियाच्या माध्यमांतून चुकीच्या गोष्टी समोर येत आहेत. एटीएममधून 

स्वतःचे पैसे काढताना कार्डधारकाने स्वतःच्या पासवर्डबाबतीत गुप्तता राखावी. पालकांनी स्वतःच्या  पाल्यांवर लक्ष केंद्रीत करून मोबाईलच्या अतिवापरापासून त्यांना रोखावे. जेणेकरून नकारार्थी घटना टाळता येतील. इंटरनेटच्या अतिवापरामुळे आपल्या शरीराच्या नुकसानीबरोबरच आपले मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता असते. अभ्यासावरही त्याचा गंभीर परिणाम होत असतो. त्यामुळे इंटरनेटवरील व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब आदींसारख्या सुखनैव सोयीचा वापर टाळणे हितकारक  आहे.

चेअरमन पार्सेकर म्हणाले, की विद्यार्थ्यांनी माहिती तंद्राज्ञानाच्या या युगात समयसूचक व्हावे. गरज तिथेच सोशल मीडियाचा वापर करताना अनावश्यक गोष्टी टाळाव्यात. संस्थेच्यावतीने पोलिस अधीक्षक  कश्यप यांना भेट वस्तू प्रदान केली. चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दीपप्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ केला. आशुतोष कुडव, तेजस दाभोलकर, रुद्रेश नाटेकर, दुर्वा मांद्रेकर, कॅलरी फर्नांडिस आदी विद्यार्थ्यांनी सायबर क्राईम संदर्भात कश्यप यांना प्रश्‍न विचारले. अध्यापिका अनुजा नाईक व वैशाली परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंदकिशोर बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार विपुल घारे यांनी मानले.