Tue, Nov 13, 2018 01:46होमपेज › Goa › शिक्षण संचालनालयाचा प्रवेशासाठी मदतीचा हात

शिक्षण संचालनालयाचा प्रवेशासाठी मदतीचा हात

Published On: Apr 26 2018 2:14AM | Last Updated: Apr 26 2018 2:14AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील कोणत्याही प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत  विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नसल्यास , अशा विद्यार्थ्यांना घरानजीकच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी शिक्षण संचालनालय मदत करणार आहे, असे शिक्षण संचालक गजानन भट यांनी सांगितले.

पालकांचा आपल्या पाल्यांना राहत्या घराजवळील  आणि चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, असा  नेहमी प्रयत्न असतो. मात्र काही शाळांमध्ये नेहमीच गर्दी असते, तर काही शाळांची   पटसंख्या कमी असल्याने प्रवेश  मिळण्यात अडचणी येतात, अशा   विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील कोणत्याही 2-3 शाळांची नावे प्राधान्यक्रमाने देऊन आपला भ्रमणध्वनी व घरच्या पत्त्याची शिक्षण संचालनालयाकडे नोंद करावी, असे  आवाहन शिक्षण संचालनालयाने पत्रकाद्वारे केले आहे. 

उत्तर गोव्यातील विद्यार्थ्यांनी म्हापसा येथील उत्तर शिक्षण विभागीय कार्यालय अथवा  पणजीतील नॅशनल थिएटरजवळील  केंद्रीय शिक्षण विभागीय कार्यालयात नोंदणी करावी.  दक्षिण गोव्यातील 
विद्यार्थ्यांना मडगाव येथील जुना बाजार येथील दक्षिण शिक्षण विभागीय कार्यालयाकडे संपर्क साधावा,असे  सदर पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

 संचालक भट म्हणाले, की प्रत्येक शाळेत सरकारसाठी आणि शाळेच्या व्यवस्थापनासाठी  सुमारे 10 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या कोट्यातून काही मुलांना शाळेत प्रवेश देण्याचा सरकार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्व शाळांना विद्यार्थी व पालकांच्या माहितीची नोंद घेऊन त्यानुसार गुण देण्यास सांगितले आहे. 

आता विद्यार्थी वंचित राहणार नाही...

शाळेच्या किती किलोमीटर्स अंतरावर विद्यार्थ्याचे घर आहे. शाळेत पालकांपैकी आधी कुणी शिक्षण घेतले असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यास सांगण्यात आले आहे. शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या कोणताही विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहू नये, याची सरकार काळजी घेणार आहे.

Tags : goa, education, Directorate of Education, admission