Sun, Nov 17, 2019 09:18होमपेज › Goa › गुजरात दरोड्याच्या सूत्रधारासह तिघा जणांना केपे येथे अटक

गुजरात दरोड्याच्या सूत्रधारासह तिघा जणांना केपे येथे अटक

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 1:23AMमडगाव : प्रतिनिधी 

गुजरात राज्यात 3.4 कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि गुजरात पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील एक अट्टल गुन्हेगार नारायण संन्याल (मंगळुरू) याच्यासह तिघांना केपे पोलिसांनी  केपे येथील एका बंगल्यातून  ताब्यात घेतले आहे.

गुजरात येथे दरोडा घातल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुजरात पोलिसांनी एका संशयिताला पकडले होते. तर अन्य एक संशयित पोलिसांच्या हातून निसटला होता. त्याच्या मोबाईल लोकेशनच्या आधारावर त्याचा शोध घेतला जात होता. लोकेशनच्या आधारे तो गोव्यात पोहोचल्याचे पोलिसांना समजले होते. गुजरात पोलिसांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा गुन्हेगार केपे भागात लपून बसल्याची   माहिती दिली होती. गावस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत-देसाई यांनी तपास करून अट्टल गुन्हेगार संन्याल याला ताब्यात घेतले.

रविवारी रात्री केपे येथील वनखात्याच्या कार्यालयाजवळ असलेल्या एका बंगल्यासमोर एक कर्नाटक नोंदणीची आलिशान कार पार्क केलेली केपे पोलिसांना आढळली. पोलिसांनी त्या बंगल्याच्या मालकांशी संपर्क साधला असता, बंगल्याच्या मालकाने आपले काही नातेवाईक कर्नाटक राज्यातून आल्याचे  सांगितले. त्यांच्यावर संशय आल्यामुळे भ्रतानो पाशेतो यांनी बंगल्याची तपासणी केली असता आत तिघेजण बसून असल्याचे त्यांना दिसले. त्या तिघांची चौकशी केली असता गुजरात दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी नारायण सन्याल(मंगळुरू) असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले आहे.

गुजरात पोलिस गोव्यात पोहोचले असून गुरुवारी त्या तिघांना केपे न्यायालयात हजर करून त्यांना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.