होमपेज › Goa › ‘निपाह’बाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी : मंत्री राणे

‘निपाह’बाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी : मंत्री राणे

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 11:41PMपणजी : प्रतिनिधी

‘निपाह’ बाबत   केंद्र सरकारने राज्य सरकारला   खबरदारीचा इशारा (अलर्ट) दिला नसला तरी  मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात  मार्गदर्शक तत्वांमध्ये ‘निपाह’च्या लागणीची लक्षणे तसेच खबरदारीच्या उपायांचा समावेश असल्याची माहिती  आरोग्यमंत्री  विश्‍वजीत  राणे यांनी बुधवारी पर्वरी येथे सचिवालयात ‘निपाह’संदर्भात  आयोजित बैठकीनंतर दिली.‘निपाह’ची   गोव्यात  बाधा झाल्यास  संभाव्य स्थिती हाताळण्यासाठी राज्य आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत अन्य सरकारी खात्यांच्या प्रतिनिधींचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

केरळच्या कोझीकोडी जिल्ह्यात ‘निपाह’ हा विषाणू पसरला असून त्यामुळे आतापर्यंत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींची प्रकृतीही गंभीर आहे. या पार्श्‍वभूमीवर  राज्य सरकारकडून गोव्यात खबरदारी घेतली जात आहे. आरोग्यमंत्री राणे म्हणाले, राज्यात ‘निपाह’ची लक्षणे  असणारा  रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती   कळवण्याबाबतचे परिपत्रक सर्व  सरकारी तसेच खासगी डॉक्टरांना जारी केले जाणार आहे.   त्यानुसार  संशयित  रुग्णांच्या रक्ताचे नमूने  तपासणीसाठी  गोमेकॉ  इस्पितळात   तसेच   पुणे येथील   नॅशनल इन्स्टिट्युट  ऑफ व्हायरोलॉजी कडे   पाठविण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

गोव्यात ‘निपाह’ची लागण झालेला रुग्ण  अद्याप आढळून आलेला नाही. त्यामुळे लोकांनी याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही, असेही त्यांनी  सांगितले. निपाह ची  लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णाची कसून चौकशी करावी तसेच त्याची कारणेही शोधून काढावी, अशी सूचना केंद्रीय शहरी आरोग्य मंत्रालयाने  केली आहे, असे आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.या बैठकीला आरोग्य खात्याचे  तसेच  विविध सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

दक्षतेच्या सूचना

‘निपाह’चा विषाणू वटवाघळांमुळे  पसरतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे    पक्ष्यांनी अर्धवट   खाल्लेली  फळे लोकांनी सेवन करू नयेत,   आंब्यांचा हंगाम सुरू असल्याने   पालकांनी   मुलांची विशेष काळजी घ्यावी,  धुतल्यानंतरच फळे खावीत,  स्वतःची  स्वच्छता राखावी  तसेच   घराशेजारी वापरात असलेली विहिर  झाकून ठेवावी, असे  आवाहन आरोग्य खात्यातर्फे केले आहे