Tue, May 21, 2019 04:36होमपेज › Goa › ‘ग्रेटर पणजी पीडीए’ला वाढता विरोध 

‘ग्रेटर पणजी पीडीए’ला वाढता विरोध 

Published On: Feb 26 2018 12:42AM | Last Updated: Feb 26 2018 12:04AMपणजी : प्रतिनिधी

‘ग्रेटर पणजी पीडीए’ ला वाढत्या विरोधात  आणखी चार ग्रामसभेची भर पडली. कुडका-बांबोळी-तळावली, चिंबल, आजोशी-मंडूर आणि शिरदोण या रविवारी पार पडलेल्या चार ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांनी सदर पंचायत क्षेत्रांचा पीडीएत समावेश  करण्याला एकमुखी विरोध असल्याचा ठराव संमत केला. यामुळे पीडीएच्या निर्मितीला अडचणीचा सामना करावा लागणार आहे. 

‘पणजी ग्रेटर पीडीए’त समाविष्ट असलेल्या सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील पंचायतींमध्ये पीडीएविरुद्ध उद्रेक वाढत आहे. याआधी सांताक्रुझ पंचायतीने पणजी पीडीएत कालापूर, बोंडवाल तळे, शेती, भाटे आदी भागांचा पीडीएत समावेश न करण्याचा पहिला ठराव बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी, कुडका-बांबोळी-तळावली, चिंबल, आजोशी-मंडूर आणि शिरदोण या चार ग्रामसभांत  चर्चा झाल्यावर पीडीएत सामील न होण्याचा ठरावही एकमताने संमत करण्यात आला. 
चिंबल पंचायतीने रविवारी बोलावलेल्या खास ग्रामसभेत स्थानिक ग्रामस्थांनी एवढी गर्दी केली होती की, सभागृह तुडूंब भरून लोक बाहेरही उभे राहिले होते. अनेकांनी जागा नसल्याने सरपंच चंद्रकांत कुंकळ्येकर यांना  लोकांचा प्रतिसाद पाहून आधीच दुसर्‍या ठिकाणी सोय न केल्याबद्दल धारेवर धरले. काहींनी  ग्रामसभा पुढील आठवड्यात नव्या ठिकाणी घेऊन रविवारची सभा रद्द करण्याची मागणी केली. शेवटी ग्रामसभा तिथेच घेऊन त्यात चिंबल भागातील जमिनीचा  ‘ग्रेटर पणजी पीडीए’त समावेश करण्याला कडाडून विरोध केला. 

ग्रामस्थ पॉल फर्नांडिस, गोविंद शिरोडकर, मॅन्युएल फर्नांडिस यांनी पीडीएत समावेश केल्याने चिंबल गावावर पर्यावरण, ओळख, संस्कृती आणि वारसा रक्षणार्थ काय परिणाम होतील याची स्थानिकांना माहिती दिली. कदंब पठार तसेच मिलिटरी कॅम्पवर इमारतींच्या रांगा  लागल्यावर हिरवाई, जलस्रोत आणि सखल भाग नष्ट होणार असल्याचे सांगितले. तुकाराम कुंकळ्येकर यांनी गावकर्‍यांना आधीच वीज, पाणी, कचरा आदी समस्या भेडसावत असून  त्यावरील नियंत्रण जाण्याचा धोका सांगितला. वाझ यांनी केवळ गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या भल्यासाठी  पीडीए स्थापन केल्याचा आरोप केला. काही ग्रामस्थांनी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी स्वत: चिंबल गावात येऊन पीडीएमागचा हेतू विशद करण्याची मागणी केली. यानंतर सरपंच तसेच सर्व पंचायत संदस्यांसह गावकर्‍यांनी चिंबलचा भाग पीडीएत समाविष्ट न करण्याचा ठराव मंजूर केला. 

आजोशी मंडूर आणि शिरदोण या दोन्ही पंचायतींमध्ये अन्य विषयांसोबत पीडीए बाबतच्या विषयावर चर्चा झाली. या दोन्ही पंचायतींनीही सांतआंद्रे मतदारसंघातील काही भाग ‘ग्रेटर पणजी पीडीए’त समाविष्ट करण्यास स्पष्ट विरोध असल्याचा ठराव मंजूर केला. 

जनसुनावणी घेण्याची मागणी 

सांताक्रुझ आणि सांतआंद्रे मतदारसंघातील काही भाग ‘ग्रेटर पणजी पीडीए’त समाविष्ट करण्याबाबत जनसुनावणी घेण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनी केला. या सुनावणीमध्ये ‘पीडीए’च्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन्ही गटांना एकाच व्यासपीठावर आपापली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. या जनसुनावणीला स्थानिक आमदार, पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य, तज्ज्ञ, महिला, युवा  आदी गटांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती रामा काणकोणकर यांनी दिली.