Sun, Jul 21, 2019 12:03होमपेज › Goa › ‘ग्रेटर पणजी’तून वादग्रस्त गावे वगळली 

‘ग्रेटर पणजी’तून वादग्रस्त गावे वगळली 

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMपणजी : प्रतिनिधी

येथील ‘ग्रेटर पणजी’ पीडीएतून पणजी शेजारच्या मतदारसंघातील ग्रामीण भाग वगळण्याच्या मागणीसाठी केलेल्या जनआंदोलनाला यश आले असून सांताक्रुझ, सांतआंद्रे, बांबोळी तसेच कदंब पठारावरील बहुतांश भाग ‘ग्रेटर पणजी’ पीडीएतून वगळण्यात आल्याची अधिसूचना नगरनियोजन खात्याने शुक्रवारी जारी केली. दरम्यान, काही गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळली गेली असली तरी नगरनियोजन खात्याच्या एकूण भूमिकेबाबत गोंयकार अगेंन्स्ट पीडीए संघटनेने असमाधान व्यक्‍त केले आहे.

राज्य सरकारने ‘ग्रेटर पणजी’ पीडीएची घोषणा करून सुमारे तीन महिने झाल्यानंतर सदर भाग वगळण्याची अधिसूचना काढली गेली आहे. मात्र, ताळगाव पंचायतीचा अधिकतर भाग ‘ग्रेटर पणजी’ पीडीएत तसाच ठेवण्यात आला आहे. 

‘ग्रेटर पणजी’ पीडीएच्या स्थापनेबाबत तसेच लोकांना विश्‍वासात न घेता अनेक गावांचा   त्यात समावेश केल्याबद्दल सांताक्रुझ तसेच सांतआंद्रेतील मतदारसंघातील गावकर्‍यांनी आंदोलन छेडले होते. पणजी येथे आझाद मैदानावर पाच दिवसांचे साखळी उपोषणही करण्यात आले होते.   

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी 31 मार्च 2018 रोजी ग्रामस्थांनी   केलेल्या मागणीची व त्यांच्या भावनांची  दखल घेऊन  ग्रेटर पणजी पीडीएतून    सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील गावे  वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. यापुढे ग्रेटर पणजी पीडीएत केवळ ताळगाव व कदंब पठारातील काही भागांचा समावेश असेल, असेही सांगितले होते. त्यानुसार  खात्याने शुक्रवारी वादग्रस्त गावे ग्रेटर पणजीतून वगळणारी अधिसूचना जारी केली.

सांताक्रुझ व सांतआंद्रे या दोन्ही मतदारसंघांतील सांताक्रुझ, बांबोळी-कुडका, शिरदोण, आजोशी-मंडूर या गावांचा ग्रेटर पणजी पीडीएत समावेश करण्यात आला होता. मात्र, नंतर वाढत्या लोकभावनेचा आदर करत सांताक्रुझ व सांतआंद्रेच्या आमदारांनी  त्यांच्या मतदारसंघातील गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्याची मागणी केली होती. याबाबत ग्रामस्थांनी सरदेसाई यांना निवेदनदेखील सादर केले होते. पीडीएतून सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील गावे वगळण्याची मागणी करण्यासाठी 6 एप्रिल रोजी पणजीत भव्य मोर्चा काढला गेला होता.