Wed, Apr 24, 2019 22:21होमपेज › Goa › आदर-सन्मानात समानता हवी

आदर-सन्मानात समानता हवी

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 08 2018 11:59PMमडगाव : प्रतिनिधी

स्त्री पुरुषांमधील समानता आदर सन्मानात असावी, मात्र समानतेच्या नावावर घरोघरी दंगल हाऊ नये. समज हा थाळीत भरलेल्या तांदळासारखा आहे त्यात चांगले व वाईट दोन्ही सापडतील, अशावेळी वाईट बाजूला ठेऊन त्यात असलेले चांगले पुढे घेऊन जावे.  व्यक्‍तीचे व्यक्‍तिमत्त्व मोठे असल्यास अनेक गोष्टी शक्य होऊन जातात, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केले. मडगाव रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिना निमित्त ‘सावित्री फुला’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. 

त्या पुढे म्हणाल्या की, महिला वर्षातील 365 दिवस कोणत्याच अपेक्षा न बाळगता काम करते. तिच्या सन्मानासाठी साजरा होणारा हा एक दिवस खूप कमी असला तरीही तो  खास व मौल्यवान आहे. मृदुला सिन्हा यांनी  दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अंजली शेरावत, कुठ्ठाळी मतदारसंघाच्या आमदार एलिना साल्ढाणा, मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई, रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष साईश पाणंदीकर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवर उपस्थित होते. समाजात स्त्री व पुरुषांना समान स्थान प्राप्त व्हायला हवे. समाजातील स्त्री व पुरुष हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. दोघांच्या भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी प्रत्येकजण आपले काम प्रामाणिकपणे करतो. त्यामुळे कोणाच्याच कर्तृत्वाला कमी लेखून चालणार नाही.

जन्मापासून मृत्यूपर्यंत स्त्रीला अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. प्रत्येकाचे मन जपण्यात तिचे आयुष्य सरते, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पुरुषांना कमी लेखून वा दुर्लक्षित ठेवून नव्हे तर स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने आदर सन्मान दिला पाहिजे. समानातेविषयी भरपूर बोलले जाते. मात्र, पुरुष व महिलांना प्रत्यक्षात  समान हक्‍क देताना समाजात अनेकांची संकुचित विचारधारा आड येते, असे यावेळी जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांनी सांगितले. लोकांनी परिस्थितीनुसार आपले विचार बदलावे. पूर्वी चूल आणि मुल यातच स्त्री गुरफटून राहत असे. परंतु, आता काळ बदलला आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले.  फॅशन डिझायनर वर्मा डिमेलो, गायिका सुमेधा देसाई, फॅशन डिझायनर रिद्धी सिद्धी म्हापसेकर यांना शाल व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मयुरा नायक यांनी सर्वांचे आभार मानले.