Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Goa › सरकार स्थिर, कार्यकाल पूर्ण करणार! : सुदिन ढवळीकर

सरकार स्थिर, कार्यकाल पूर्ण करणार! : सुदिन ढवळीकर

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMमडगाव : प्रतिनिधी 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपात विलीन करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. भाजप आघाडी  सरकार कोसळणार या अफवा आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज्यात सत्तेत असलेले युतीचे सरकार  स्थिर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असा ठाम विश्‍वास सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला.

मंत्री सुदिन ढवळीकर यांनी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्यासमवेत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध अधिकार्‍यांबरोबर गुरुवारी बैठक घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी आमदार लवू मामलेदार यांनी मगो पक्ष ढवळीकर कुटुंबाची मालमत्ता झाला असून लवकरच एका राष्ट्रीय पक्षात त्याचे विलीनीकरण करण्याचा डाव आहे, असा आरोप केला होता. त्याबद्दल ढवळीकर यांना छेडले असता मगोप कोणत्याही स्थितीत भाजपात विलीन होणार नाही, असे सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. मंत्रिमंडळातील मंत्री प्रशासकीय कामकाज हाताळण्यास  सक्षम असून  पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत इतर खाती सांभाळण्याची क्षमता आमच्या मंत्र्यांमध्ये आहे, असे ढवळीकर म्हणाले. काँग्रेसला     स्वतःचे विषय सोडवायचे आहेत, म्हणून ते विजय सरदेसाई व आपल्या बरोबर इतरांची भेट घेत आहेत, असा गौप्यस्फोटही ढवळीकर यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत मगोपकडून उमेदवार उभा करण्याविषयी कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. सध्या आम्ही युतीच्या सरकारचे घटक आहोत.लोकसभेसाठी उमेदवार उभा करायचा की, नाही याचा निर्णय मगोची समिती घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मगोप हा सर्वात जुना पक्ष आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी हा पक्ष पुढे नेण्यासाठी काम केले. त्यांच्यानंतर शशिकलाताई काकोडकर, रमाकांत खलप, काशिनाथ जल्मी, बाबूसो गावकर अशा अनेकांनी हा पक्ष पुढे नेला. मध्यंतरी रवी नाईक पक्ष सोडून गेले होते, त्यावेळी पक्षाला गळती लागली होती. पांडुरंग राऊत गेल्यानंतर पक्षाची धुरा ढवळीकरांकडे आली आहे. या  काळात मगोपने राज्याला अनेक आमदार आणि मंत्री दिले आहेत, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

बैठकीनंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, मडगाव पालिकेजवळ अठरा खुल्या जागा आहेत; ज्यांचा विकास होणे आवश्यक आहे. बांधकाम विभाग आठला याची माहिती देण्यात आली आहे, असेही  ते म्हणाले.

पोलिस वसाहत आणि जीर्ण झालेल्या जुन्ता क्वाटर्सची इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्याचे सरदेसाई म्हणाले. नव्याने तयार होणार्‍या जिल्हा इस्पितळासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी, इस्पितळात जाण्यासाठी थेट रस्ता, आर्ले ते अंबाजी रस्त्याचे काम आणि रिंग रोडच्या कामांचा पाठपुरावा या बैठकीत करण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

रावणफोंड, आर्लेम, नुवे जंक्शनवर उड्डाणपूल बांधणार ः ढवळीकर

वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण क्षेत्रे वगळण्यासाठी रावणफोंड, आर्लेम, आणि नुवे जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याचे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केलेे. राज्यभरातील खराब रस्त्यांसाठी संबंधित कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात आले असून अशा रस्त्यांसाठी त्यांचे बिल फेडले जाणार नाही, अशी माहिती देऊन ऑक्टोबरपासून सर्व चाळीसही मतदारसंघांतील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे ढवळीकर यांनी  सांगितले.