Mon, Apr 22, 2019 01:41होमपेज › Goa › सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलावा : जर्नादन भंडारी 

सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलावा : जर्नादन भंडारी 

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

महागाईवर नियंत्रण आणण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीचा जनतेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च  उचलावा, अशी मागणी गोवा प्रदेश एनएसयूआयचे प्रभारी जर्नादन भंडारी यांनी पणजी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

भंडारी म्हणाले, की या संदर्भात राज्यपाल मृदुला सिन्हा यांना  निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, उच्च शिक्षण संचालक, कदंब महामंडळाचे अध्यक्ष, वाहतूक संचालक यांनाही सादर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही.  विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सरकारने  संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलावा, त्यांच्या वाहतुकीचा खर्च तसेच  शाळांच्या वाढीव वेळावर त्वरित तोडगा काढून शाळांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 1 अशी करावी.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे   विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांवरही परिणाम होत आहे. विशेष करुन आर्थिक परिणाम अधिक होत असून घर चालवताना तसेच  आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा भार उचलताना पालकांची ओढाताण होत आहे.  त्यातच जीएसटी, नोटबंदी , महागाई सारख्या गोष्टींनी अडचणीत अधिकच भर पडत आहे. राज्यात शाळांची  वेळ सकाळी 8 ते दुपारी 1 इतकी  होती. मात्र, काही वर्षा पूर्वी त्यात वाढ करण्यात आली आहे. सदर वेळ केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर  त्यांच्या पालकांनाही त्रासदायक ठरली असून ती गैरसोयीची बनली आहे. त्यामुळे सरकारने शाळांच्या वाढीव वेळांत बदल करुन ती पूर्ववत करावी, अशी मागणीही भंडारी यांनी केली. प्रदेश काँग्रेसचे  प्रवक्ते अ‍ॅड. यतिश नाईक, सिमरन मळकर्णेकर व अन्य उपस्थित होते.