Tue, Jul 23, 2019 10:41होमपेज › Goa › सरकारतर्फे लवकरच टॅक्सीसेवेसाठी ‘अ‍ॅप’

सरकारतर्फे लवकरच टॅक्सीसेवेसाठी ‘अ‍ॅप’

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:21PMपणजी : प्रतिनिधी

पर्यटन हा गोव्याचा मुख्य व्यवसाय असल्याने पर्यटकांच्या सोयीसाठी लवकरच सरकारतर्फे मोबाईल अ‍ॅप लागू करण्यासह नव्या उपाययोजना राबवण्याचा सरकारचा मानस आहे. विमानतळावर सरकारचे टॅक्सी काऊंटर, टॅक्सींची संख्या वाढवणे, टॅक्सी मिळवण्यासाठी   सरकारी ‘अ‍ॅप’ आणि ‘डिजिटल मीटर’ बसवणे आदी योजना लवकरच अंमलात आणल्या जाणार आहेत, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

राज्यात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस टॅक्सीवाल्यांनी संप पुकारल्यामुळे अनेक भागातील पर्यटकांना अतोनात त्रास झाल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या. या तक्रारींची दखल घेऊन कडक उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे पर्रीकर यांनी  सांगितले. 

पर्रीकर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या टॅक्सीवाल्यांच्या संपामुळे देशभरातील पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागल्याने  पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याचे निश्‍चित केले आहे. दाबोळी विमानतळावर टॅक्सींची संख्या कमी असल्याने  नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे आता यापुढे टॅक्सींचा कक्ष चालवला जाणार असून त्यात नोंदणीकृत टॅक्सींना किमान व्यवसाय देण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांना टॅक्सीसेवा नको, त्यांच्यासाठी ‘कदंब’च्या अतिरिक्त फेर्‍याही सुरू केल्या जाणार आहेत.

पर्यटकांना टॅक्सी मिळवण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नसून त्यांना ऑनलाईन टॅक्सी सेवा उपलब्ध होणार आहे. महामंडळातर्फे टॅक्सी पाचारण करण्यासाठी येत्या 3-4 महिन्यांत खास ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू केले जाणार असून  ते पर्यटकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय टॅक्सींना ‘डिजिटल मीटर’ बसवण्याबाबत सर्व घटकांशी चर्चा करून  येत्या 7 ते 8 महिन्यांत ते बसवले जाणार आहेत.