Sun, Mar 24, 2019 08:52होमपेज › Goa › सरकार खाणी सुरू करण्यात अपयशी

सरकार खाणी सुरू करण्यात अपयशी

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 12 2018 1:26AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण व्यवसायासंबंधी  सर्वोच्च न्यायालयाने निवाडा  देऊन तीन महिने उलटले तरी खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास सरकारला अपयश आल्याची टीका  प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. यतीश नाईक यांनी  शुक्रवारी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत राज्यातील  प्रशासन ठप्प झाले आहे.  त्रिमंत्री सल्‍लागार समिती  म्हणजे एक फार्स  असल्याची टीकाही त्यांनी  केली.

अ‍ॅड. नाईक म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयाने  राज्यातील 88 खाण लीजांचे नूतनीकरण केलेले परवाने रद्द करण्याचा निवाडा 7 फेब्रुवारी रोजी दिला होता.  या निवाडयाला आता तीन महिने उलटले  तरी अजूनही सरकारने खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासंबंधी कुठल्याच हालचाली केल्या नाहीत.   खाणींसंदर्भात  नक्‍की  कोणती पावले उचलावीत याचाही निर्णय सरकारला घेता आला नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या  नियमांनुसार पुनर्विचार याचिका ही निवाडयाच्या 30 दिवसांच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. खाणी संदर्भात सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार , असे सरकार म्हणत असले तरी  प्रत्यक्षात  आता  निवाडा होऊन तीन महिने उलटले आहेत. त्यामुळे या याचिकेचे काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित होतोे. मागील तीन महिन्यात सरकारने खाण व्यवसाय  पुन्हा   सुरू करण्याबाबत केवळ तोंडी आश्‍वासने दिली. प्रत्यक्षात कृती काहीच केली नसल्याचेही  ते म्हणाले.

खाण लीजांच्या बेकायदेशीर नूतनीकरणप्रकरणी  गोवा फाऊंडेशन या  स्वयंसेवी संस्थेने  तत्कालीन  मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विरोधात लोकायुक्‍तांकडे तक्रार दाखल केली आहे. या  तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर  पार्सेकर यांनी   लीज  नूतनीकरणाची   प्रक्रिया पर्रीकर सरकारच्या धोरणांनुसारच केल्याचे नमूद केल्याचेही  अ‍ॅड. नाईक यांनी  सांगितले.प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते  उर्फान मुल्‍ला,  विजय पै व प्रशांत चणेकर यावेळी उपस्थित होते. 

खाणींबाबत सरकारला  सहकार्य : नाईक

राज्यातील खाण व्यवसायावर  मोठया प्रमाणात लोक अवलंबून आहेत. त्यामुळे खाणी ताबडतोब पुन्हा सुरु व्हाव्यात, अशी काँग्रेसची देखील इच्छा आहे. यासाठी विद्यमान सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र, सरकारकडून खाणींबाबत पावले उचलण्यात चालढकल होत असल्याची टीका   प्रदेश काँग्रेस प्रवक्‍ते अ‍ॅड. यतीश नाईक यांनी  केली.