Sat, Jul 20, 2019 11:28होमपेज › Goa › खाण व्यवसायाला ‘अच्छे दिन’

खाण व्यवसायाला ‘अच्छे दिन’

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 10 2017 11:19PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज दरात वृध्दी झाल्याने गोव्यातील मरगळलेल्या खनिज उद्योगासाठी  ‘अच्छे दिन’ येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.  गोव्यातील खनिज निर्यातीचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत घटले असले तरी आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर वाढल्याने खाण उद्योजक, ट्रक व अन्य यंत्रणा पुरवणार्‍या खाण अवलंबितांना दिलासा मिळणार आहे.

राज्याच्या खनिज निर्यातीत गतसालच्या तुलनेत 75 टक्के  घसरण झाली असल्याने खाण उद्योगात मरगळ  पसरली होती. गोव्यातील कमी ग्रेडच्या लोह खनिजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी घटल्याने निर्यातीवर विपरित परिणाम झाला होता. 

मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आठ-दहा दिवसांपूर्वीच खनिजाचे दर सरासरी 15 टक्क्यांनी वाढले आहेत. भारत सरकारच्या ‘नॅशनल मिनरल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने’ही 13 टक्क्यांनी खनिज दर वाढवलेले आहेत. यामुळे गोव्याच्या कमी ग्रेडच्या खनिजालाही निर्यातीसाठी चांगले दिवस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यासंबंधी, खाण अभ्यासक  तथा अर्थतज्ञ राजेंद्र काकोडकर  यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिजाला वाढीव दर मिळणार असल्याने आता खाण व्यावसायिकांनाही खनिजवाहू  ट्रकमालकांनाही वाहतूक दर वाढवून  देणे शक्य होणार आहे. यामुळे  ट्रकमालकही त्यामुळे नव्या जोमाने काम करू शकतील.

गोवा खनिज निर्यातदार संघटनेचे सरचिटणीस ग्लेन कलवाम्परा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्यातील खाण व्यावसायिक टिकायचे असतील तर निर्यातीवरील कर कमी होणे गरजेचे आहे. यात  60  ग्रेडपर्यंतच्या खनिजावरील निर्यात कर हटवण्याची खाण व्यावसायिकांची मागणी असून ती त्यांनी केंद्र सरकारकडेही मांडलेली आहे. 

गोव्यात मिळणारे खनिज हे 58 ग्रेड वा त्याहून कमी प्रतिचे असते. चीन व जपान या राष्ट्रांना उच्च प्रतिच्या खनिजाची गरज असली तरी गोव्याकडून ती पूर्ण होत नाही. गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर-2017 या दोन महिन्यांत खनिज निर्यातीचा आकडा गतसालच्या तुलनेत 75 टक्के घटला आहे.    ऑक्टोबर- नोव्हेंबर 2016 या दोन महिन्यांत एकूण 28.4 मेट्रीक टन खनिजाची निर्यात झाली होती. यंदाच्या वर्षात याच दोन महिन्यांत हा आकडा 6.8 मेट्रीक टन एवढा खाली घसरला असल्याचे उघड झाले आहे. सदर खनिज निर्यात वास्को येथील ‘मुरगाव  पतन न्यास’च्या (एमपीटी) बंदरातून विदेशात झाली होती. याआधी खाणी बंद पडण्याआधी 2012 साली राज्यातून 50 दशलक्ष टनांपर्यंत खनिज निर्यात होत होती.