Fri, Jul 19, 2019 01:02होमपेज › Goa › पंतप्रधान मोदींमुळे खादीला चांगले दिवस : मृदुला सिन्हा

पंतप्रधान मोदींमुळे खादीला चांगले दिवस : मृदुला सिन्हा

Published On: Aug 19 2018 1:30AM | Last Updated: Aug 19 2018 12:43AMमडगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आजच्या काळात खादीला चांगले दिवस आले असून देशाच्या विकासात खादी महत्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन  राज्यपाल डॉ.मृदुला सिन्हा यांनी केले. खादी ग्रामोद्योग भवन आणि खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे मडगाव येथील नूतनीकरण केलेल्या खादी भवनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. 

दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना, खादी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. नारायण सावंत, आय.एस. जवाहर, राम गोपाल सिन्हा व इतर मान्यवर उपस्थित होते.

सिन्हा म्हणाल्या, की खादी आणि स्वातंत्र्याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. स्वातंत्र्यापूर्वी ग्रामीण भागातील लोकांनी कामासाठी शहरावर अवलंबून राहू नये म्हणून खादी तयार करण्याचे काम शिकविण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या काळात या खादीला चळवळीची जोड मिळाली, मात्र काळाच्या ओघात खादी दुर्लक्षित राहिली होती. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  पंतप्रधान झाल्यावर खादी व्यवसाय नव्याने फुलू लागला आहे.  खादीचा विकास  व्हावा यासाठी सर्वांनी खादी वापरण्यास सुरवात केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. गोव्याच्या वातावरणाला खादी पूरक आहे. शिवाय चरख्याचा वापर करून खादीचे  कपडे तयार करणार्‍यांना सरकारच्या योजनांची माहिती पुरविणे  गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत बनविण्यासाठी सवार्ंनी   खादी कपड्यांची खरेदी केली पाहिजे,असे  खासदार नरेंद्र सावईकर यांनी  सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतल्याने पुन्हा बहरलेला खादी व्यवसाय दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. नूतनीकरण केलेले खादी भवन लोकांसाठी पर्वणीच असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मडगाव येथील ग्रेस चर्चजवळ खादी भवन असून भवनात वैविध्यपूर्ण खादी कपडे, कुर्ते, सुगंधित अगरबत्ती, साबण आदी वस्तू उपलब्ध आहेत.