Thu, Apr 25, 2019 17:33होमपेज › Goa › गोमेकॉत ‘कॅन्सर ओपीडी’

गोमेकॉत ‘कॅन्सर ओपीडी’

Published On: Apr 21 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 1:14AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोमेकॉत कर्करोगग्रस्तांसाठी बाह्यरुग्ण  विभाग  तसेच प्लास्टिक सर्जरी आणि ‘बर्नस् युनिट’ अशा तीन नव्या विभागांचे शुक्रवारी (दि.20) आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कर्करोगग्रस्तांच्या बाह्यरुग्ण विभागाच्या व्यवस्थापनासाठी गोमेकॉ  प्रशासन आणि बेळगावस्थित ‘केएलई इस्पितळ’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.

राणे म्हणाले की, गोमेकॉत परिपूर्ण असा नवीन कर्करोग विभाग सुरू करण्यासाठी ‘केएलई’ सारख्या मान्यवर संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. ‘केएलई’ आपल्या कर्करोग रुग्णांसाठी गोमेकॉतदेखील खास बाह्यरुग्ण विभागाचा वापर करणार आहे. गोव्याचे  स्वत:चे विभागीय कॅन्सर सेंटर स्थापन होईपर्यंत, सदर व्यवस्था सुरू राहणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आर्थिक सहाय्याने गोमेकॉच्या संकुलातील नव्या इमारतीत विभागीय कॅन्सर सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी ‘केएलई’शी सदर खास  कर्करोग बाह्यरुग्ण विभाग चालवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. आवश्यक असल्यास गरजू रुग्णांना उपचारासाठी गोमेकॉच्या रुग्णवाहिकेद्वारे बेळगावला  ‘केएलई’मध्ये हलविण्यात येणार आहे. पणजीहून बेळगावला फक्‍त दीड तासांत पोचणे शक्य असल्याने रुग्णांना त्रासही होणार नाही. 

बेळगावच्या ‘केएलई’मध्ये देखील गोमंतकीय कर्करोगग्रस्तांसाठी स्वतंत्र विभाग तथा नोंदणी कक्ष उघडण्यात येणार आहे. यामुळे गोमंतकीयांना राज्य सरकारच्या ‘दीनदयाळ स्वास्थ्य विमा सेवा योजने’चा लाभ बेळगावातदेखील घेता येईल. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संकल्पनेतूनच सुमारे 20 कोटी रूपये खर्चून विभागीय  कॅन्सर सेंटर गोमेकॉत सुरू केले जाणार  आहे. सदर इस्पितळाचा आराखडा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आराखडा तयार झाल्यानंतर खर्चाचा अंदाज मांडून कामाच्या निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. 

यावेळी सांत आंद्रे्रचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुजचे आमदार अंतोनिओ फर्नांडिस, गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, प्लास्टीक सर्जरी व बर्नस् युनिटचे प्रमुख डॉ. युरी डायस आंबोरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

 

Tags ; Goa, Panaji news, Gomeko, Cancer OPD,