Tue, May 21, 2019 22:19होमपेज › Goa › गोमंतक मराठा समाजाला ओबोसीचा दर्जा द्यावा : दीपक पाऊसकर 

गोमंतक मराठा समाजाला ओबोसीचा दर्जा द्यावा : दीपक पाऊसकर 

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 04 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी

गोमंतक मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा खासगी ठराव सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी सभागृहात शुक्रवार विधानसभेत मांडला. 

गोमंतक  मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यासाठीची शिफारस ओबीसी आयोगाकडून सरकारकडे येणे आवश्यक आहे.  सदर विषय हा ओबीसी आयोगाच्या आख्यारित्यात येत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

आमदार पाऊसकर म्हणाले, की  गोमंतक मराठा समाजाचे लोक  राज्यातील  विविध भागांमध्ये राहतात.  या समाजाचे काही लोक उच्च पदावर आहेत तर अन्य लोकांची स्थिती चांगली नाही. या समाजाचे लोक देवळांमध्ये सेवा करीत. या समाजातील लोकांना ओबीसीचा  दर्जा मिळावा. याबाबतचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी ओबीसी आयोगाला पाठवण्यात आला होता. परंतु त्या संदर्भात आवश्यक ती हालचाल झाली नाही. त्यांना ओबीसीचा दर्जा मिळाल्यास त्यांचे जीवन सुधारेल.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की गोमंतक मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव ओबीसी आयोगाकडे असला तरी अन्य काही समाजांकडून त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.  त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या पार्श्‍वभूमीवर गोमंतक मराठा समाजासंबंधी तालुकावार सर्व्हे हाती घेण्यात आला आहे.  सदर सर्व्हे लवकर पूर्ण व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील. सर्वांना विश्‍वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल. मात्र, आयोगाकडून त्यासंबंधी शिफारस आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. आमदार दीपक पाऊसकर यांनी मांडलेल्या या ठरावाला आमदार रवी नाईक व दयानंद सोपटे यांनी पाठिंबा दर्शवला.