Mon, Jun 24, 2019 21:26होमपेज › Goa › जागतिक स्तरावर गोव्याचे नाव उंचावणार

जागतिक स्तरावर गोव्याचे नाव उंचावणार

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:54AMदाबोळी : प्रतिनिधी

दाबोळी विमानतळाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. भविष्यात गोव्याचे  सर्वोत्तम पर्यटन सेवांबरोबर जागतिक स्तरावर नाव उंचावणार, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

दाबोळी विमानतळाच्या प्रशासकीय इमारतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, महसूलमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा, दाबोळी विमानतळ संचालक भूपेश नेगी, गोव्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले की, गोव्याचे नाव जागतिक बाजारपेठेत उंचावण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे. भारतात स्टार्टअप योजनेंतर्गत गोव्यातील पर्यावरणीय व्यवस्थेचा कसा सांभाळ करावा, यासाठी येत्या जून महिन्यात जागतिक बँक आंतरराष्ट्रीय आर्थिक महामंडळ व जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. 

भारत सरकारच्या स्टार्टअपसाठी गोवा हे राष्ट्रीय राजधानी असणार आहे. दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांची समस्या सोडविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि गोवा सरकार विमानतळावर अधिक स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येईल, त्याचा लाभ स्थानिक टॅक्सी चालकांनाही मिळेल. या काऊंटरवरून जास्तीत जास्त टॅक्सी सेवा उपलब्ध होणार आहे. दाबोळी विमानतळाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे विमानतळ भविष्यात वापरात राहील व विमानतळावर आणखी     

कोणत्या सुविधांचा विस्तार करण्याची गरज आहे, याची प्रत्यक्षात पाहणी करून विचारविनिमय केला जाईल. कौशल्य विकास या योजनेअंतर्गत उड्डाण मंत्रालयात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सेवा क्षेत्राचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्यामुळे सर्व कामे व्यवस्थितपणे होत आहेत. दाबोळी विमानतळ हे एक माध्यम मानून गोवा राज्य उत्कृष्ट पर्यटनस्थळ बनविण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी गोव्यातील सर्व मंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात आली आहे, असे मंत्री सुरेश प्रभू शेवटी म्हणाले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे दाबोळी विमानतळ संचालक भूपेश नेगी यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Tags : Going up Goa globally goa news