Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Goa › शैक्षणिक हबच्या दिशेने गोव्याची वाटचाल 

शैक्षणिक हबच्या दिशेने गोव्याची वाटचाल 

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:23PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोवा राज्य शैक्षणिक ‘हब’ बनत आहे. उच्च शिक्षणाला पोषक असे वातावरण या राज्यात असून वर्षालादीड हजार ते अठराशे अभियांत्रिकी पदवीधर या राज्यात तयार होत आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा, या दृष्टीकोनातून ‘नोबेल प्राईज सीरिज इंडिया-2018’ हा सोहळा उपयुक्‍त ठरणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत  दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की ‘नोबेल प्राईज सिरिज इंडिया-2018’ हा जागतिक स्तरावरील उपक्रम प्रथमच गोव्यात तर भारतात दुसर्‍यांदा होत आहे. गोव्यात चार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. याशिवाय सहा पॉलिटेक्नीक संस्था आहेत. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, बिट्स पिलानी आणि अन्य शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थाही (एनआयओ) गोव्यात आहे. गोव्यात विज्ञान शिक्षणाला पोषक वातावरण आहे. युवकांमध्ये विज्ञान शिक्षणविषयक प्रेम वाढावे. युवकांची विचार करण्याची क्षमता विज्ञानाच्या आधारे विकसित होण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणार्‍या जैवतंत्रज्ञान खाते, गोवा सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान खाते आणि ‘नोबेल मीडिया ’-स्वीडनच्या संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय संशोधकांनी विज्ञान क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरी केली आहे. विज्ञान शिक्षणाचा प्रसार होण्याच्यादृष्टीने हा सोहळा उपयुक्‍त ठरणार आहे. जगभरातील संशोधक, नोबेल विजेते यांची भाषणे व अनुभव ऐकण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

विज्ञानविषयक चर्चासत्रे, संवाद, गोलमेज परिषद होईल. विद्यार्थ्यांसह गोव्यातील शिक्षकांना याची मदत होणार आहे. येत्या 1 फेब्रुवार 2018 रोजी या सोहळ्यास आरंभ होणार आहे. त्यानिमित्त पाच ते सहा नोबेल शास्त्रज्ञ गोव्याला भेट देणार आहेत. कला अकादमी येथे पूर्ण फेब्रुवारी महिना नोबेलविषयक प्रदर्शन खुले राहणार आहे. कला अकादमीत नोबेल पुरस्कारप्राप्त मान्यवरांकडून 2 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता विद्यार्थी व शिक्षकांशी दुपारी 1.30 वाजता चर्चा केली जाणार आहे. फोंडा येथे कला मंदिर येथे 3 फेब्रुवारीला नोबेल विजेते तांत्रिक, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांबरोबर सकाळी 10.30 वाजता संवाद साधला जाणार आहे. त्याचवेळी मडगाव रवींद्र भवनात शिक्षक- विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे.

या सोहळ्याला  केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित असतील.  देशातील तज्ज्ञ, संशोधक, शिक्षक आदी तीनशे मान्यवर व सुमारे सातशे विद्यार्थी यात भाग घेतील. यापूर्वी गुजरातमध्ये हा सोहळा झाला होता. आता गोव्यात होत आहे, असे केंद्र सरकारचे सचिव विजय राघवन यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत नोबेल मीडियाचे पाँटेस जॉन्सन, शिक्षण खात्याचे सचिव दौलत हवालदार, तंत्र-विज्ञान खात्याचे संचालक  जुझे मॅन्युएल नोरोन्हा आदी मान्यवर उपस्थित होते.