Sat, Apr 20, 2019 16:17होमपेज › Goa › गोव्याचे तिन्ही खासदार आज अमित शहांना भेटणार

गोव्याचे तिन्ही खासदार आज अमित शहांना भेटणार

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

खाणपट्ट्यातील जनतेची आणि  भाजपच्या काही आमदारांमधील वाढती अस्वस्थता कमी व्हावी, या हेतूने भाजपच्या गोव्यातील तिन्ही खासदारांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मंगळवारी (दि. 13) भेट घेण्याचे ठरवले आहे. शहा यांनी गोव्यातील खनिज खाणप्रश्‍नी हस्तक्षेप करावा, अशी मागणी घेऊन भाजपचे तिन्ही खासदार प्रथम शहा यांना भेटणार असून, त्यानंतर अन्य केंद्रीय नेत्यांना भेटण्याबाबत ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे लोकसभा खासदार नरेंद्र सावईकर व आपण मिळून तिन्ही खासदारांनी पक्षाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मंगळवारी सकाळी 11 वाजता भेट घेण्याचे निश्‍चित केले आहे. शहा यांच्याशी दूरध्वनीवर याविषयी चर्चा करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील खाण अवलंबितांच्या संसारावर कुर्‍हाड कोसळणार असून, अनेक कुटुंबीयांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून राज्यातील खाणी पूर्ववत सुरूच ठेवाव्यात, अशी विनंती  गोवेकरांच्या वतीने  शहा यांना केली  जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा त्रिमंत्री सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य सुदिन ढवळीकर सोमवारी दिल्लीला रवाना झाले. ते  मंगळवारी भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना भेटून त्यांना राज्यातील खाणबंदी आणि राजकीय परिस्थितीवर माहिती देणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.