Tue, Feb 19, 2019 22:59होमपेज › Goa › इंधनाच्या दरडोई खपात गोवा देशात अव्वल

इंधनाच्या दरडोई खपात गोवा देशात अव्वल

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 17 2018 11:20PMपणजी : प्रतिनिधी

देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सर्वाधिक दरडोई खप होणारे गोवा हे अव्वल राज्य बनले आहे. राष्ट्राच्या दरडोई पेट्रोल खपापेक्षा राज्यातील प्रमाण सहापटीने तर डिझेलचे प्रमाण साडेतीनपटीने अधिक असल्याचे इंधन मंत्रालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2017-18 सालच्या आकडेवारीनुसार, भारताचा दरमाणशी पेट्रोलचा खप 19 किलो लिटर असून राज्यात हेच प्रमाण 119 किलो लिटर आहे. डिझेलचा देशातील दरडोई सरासरी खप 66.9 किलो लिटर आहे. तर गोव्यात हे प्रमाण 225.6 किलो लिटर ठरले आहे. राज्यातील आर्थिक प्रगती, पर्यटकांची संख्या आणि आंतरराज्यातील करांमधल्या फरकामुळे राज्यातील इंधन विक्रीच्या आकड्यावर परिणाम होत असल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे मार्केटिंग संचालक सी. बी. कांथ यांनी सांगितले. 

गोव्यात अन्य राज्यांच्या तुलनेत इंधनावर असलेला कमी कर, पर्यटकांची वाढती वाहने, शेजारील राज्यात ये-जा करणार्‍या वाहनांसाठी होणारी इंधन खरेदी यामुळे राज्यातील इंधन खपात वाढ होत आहे. राज्याच्या सीमेवरील कारवार, सिंधुदुर्ग, कोकण भागातील वाहने गोव्यात येऊन इंधन भरत असल्यानेही त्यापटीने भर पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यादीत बिहार सर्वात खालच्या स्थानावर असून पेट्रोलची 6.7 किलो लिटर आणि डिझेलची 22 किलो लिटर अशी विक्रीची सरासरी आहे. राज्यांमध्ये इंधनाच्या सर्वाधिक खपामध्ये मात्र महाराष्ट्राने बाजी मारली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.