Tue, Jul 23, 2019 07:25होमपेज › Goa › संप यशस्वी करून दाखवूच

संप यशस्वी करून दाखवूच

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:18PMम्हापसा : प्रतिनिधी 

गोव्यातील टॅक्सी चालकांचा संप बेकायदेशीर ठरवून वाहतुकीत अडथळे आणणार्‍यांविरुध्द कडक कारवाई करण्याचा, तसेच परवाने  रद्द करण्याचा इशारा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला असला तरी या इशार्‍याला आम्ही घाबरत नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आम्ही लोकशाही पध्दतीने निषेध करीत आहोत. आणि शुक्रवार दि. 19 जानेवारीचा संप आम्ही यशस्वी करून दाखवूच, असे आव्हान ऑल गोवा टॅक्सी चालक संघटनेचे प्रवक्‍ते बाप्पा कोरगावकर यांनी सरकारला दिले आहे. 

कळंगुट येथील फुटबॉल मैदानावर आयोजित  केलेल्या टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस विनायक नानोस्कर, संजय कोल्हे व इतर उपस्थित होते. 

कोरगावकर म्हणाले की, टॅक्सी चालकांवर जी काही कारवाई करायची आहे ती सरकारने अवश्य करावी, आम्ही  कारवाईला घाबरत नाही. 

सरचिटणीस विनायक नानोस्कर म्हणाले की, आम्ही सरकारी यंत्रणेकडून जी परवानगी हवी ती घेतली आहे. शिवाय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनाही पत्र पाठवून संपाची सूचना दिली आहे. आमच्या एकदिवशीय संपाची त्यांना पूर्णकल्पना असल्यानेच त्यांनी 350 अतिरीक्‍त बसेसची व्यवस्था केली आहे, असे ते म्हणाले. 

संजय कोल्हे म्हणाले, आम्ही कर्ज काढून चरितार्थासाठी गाड्या विकत घेतो.  तिथे मात्र सरकार अडथळे निर्माण करुन आम्हाला सतावते. म्हणून संपाचे शस्त्र वापरावे लागत आहे, असेही ते म्हणाले.