Mon, Apr 22, 2019 21:37होमपेज › Goa › गोव्याची शून्य एड्सच्या लक्ष्याकडे वाटचाल

गोव्याची शून्य एड्सच्या लक्ष्याकडे वाटचाल

Published On: Dec 02 2017 12:25AM | Last Updated: Dec 02 2017 12:03AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील लोकसंख्येच्या तुलनेत एड्सबाधीत रुग्णांची संख्या कमी होत असून ही आनंदाची गोष्ट आहे. लवकरच ‘शून्य एड्स’च्या लक्ष्याकडे गोवा पोचणार असून ते गाठण्यासाठी आरोग्य सेवा आणि शिक्षण आणखी सशक्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी शुक्रवारी जागतिक एड्स दिनानिमित्त पर्वरी येथील सचिवालय सभागृहात गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीद्वारे आयोजित कार्यक्रमात केले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

सोसायटीचे प्रकल्प अधिकारी डॉ. ज्योस डिसा म्हणाले, यंदाच्या जागतिक एड्स दिनाचे ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ हे घोषवाक्य आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य  क्षेत्रातील सर्व घटकांनी प्रामाणिकपणे योगदान देण्याची आवश्यकता आहे. 

या प्रसंगी एड्स सोसायटीच्या कोअर समितीचे अध्यक्ष डॉ. दिगंबर नाईक, आरोग्य संचालक डॉ. संजीव दळवी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत पोरोब, डॉ. उमा सडेकर उपस्थित होते. एड्स निवारण क्षेत्रात काम करणार्‍या अप्सरा खास यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. 

गोव्यात 1987 पासून ऑक्टोबर -2017 पर्यंतच्या कालावधीत एचआयव्ही बाधीत 16 हजार 720 रुग्ण सापडले असून यातील 1 हजार 143 जणांचा मृत्यू झाला. 15 ते 49 या वयोगटात 2016 साली 75.8 टक्के एड्सग्रस्त रुग्ण सापडले. रक्तातून अथवा बाधीत इंजेक्शन सिरीज व सुयांच्या माध्यमातून एड्सची बाधा झालेल्यांची संख्या नगण्य असल्याचे सोसायटीचे प्रकल्प अधिकारी डॉ. जोस डिसा यांनी सांगितले.