Fri, Jun 05, 2020 01:34होमपेज › Goa › कर्नाटक विरोधात गोव्याची अवज्ञा याचिका 

कर्नाटक विरोधात गोव्याची अवज्ञा याचिका 

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 21 2018 1:35AMपणजी/डिचोली : प्रतिनिधी

म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या आदेशानंतरही म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या खोर्‍यात वळवून लवादाच्या निवाड्याची अवज्ञा केल्याप्रकरणी गोवा सरकारतर्फे लवादापुढे सोमवारी (दि.20) कर्नाटक विरोधात अवज्ञा याचिका दाखल करण्यात आली. म्हादई जलतंटा लवादाची मुदत 20 ऑगस्ट रोजी संपते. दरम्यान, सदर याचिकेमुळे लवादाची मुदत आणखी एक वर्ष वाढवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारने म्हादई पाणी वाटपासंदर्भात नियंत्रण मंडळ स्थापन करावे. त्यामुळे पाणी वळवण्याच्या कर्नाटकाच्या बेकायदेशीरपणावर आळा बसेल, अशी मागणी या  याचिकेत गोवा सरकारकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्हादई लवादासमोर गोवा व कर्नाटक यांचा म्हादई नदीच्या पाण्यावरून मागील अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी बेकायदेशीरपणे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसेच म्हादई जलतंटा लवादाने 17 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात सदर वादग्रस्त भागात ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. 

लवादाचा आदेश धुडकावून   कर्नाटकाने म्हादईचे पाणी मलप्रभा खोर्‍यात वळवले. कर्नाटकची ही कृती  ‘नागरी प्रक्रिया संहितेच्या (सीपीसी) कलम 39 (2अ)अन्वये न्यायालयीन आदेशाची अवज्ञा ठरतेे. त्यानुसार  गोवा सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या अवज्ञा याचिकेत वरील बाबी  नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कर्नाटककडून कणकुंबी येथे कळसा-भांडुरा प्रकल्पाद्वारे म्हादईचे पाणी बेकायदेशीररीत्या वळवण्यात येते. सदर प्रकार एकदा नव्हे तर अनेकदा केला गेल्याचे उघड झाले आहे. कर्नाटकाने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर 2017 साली कणकुंबी येथे कसल्याही प्रकारचे बांधकाम करणार नसल्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनानंतरदेखील काही महिन्यांपूर्वी कर्नाटकाने भूमिगत नाल्यातून म्हादईचे पाणी वळवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. गोवा सरकारकडूनदेखील याची गंभीर दखल घेण्यात आली होती.

म्हादई जलतंटा लवादाने मागील आठवड्यात कर्नाटकला 13.42 टीएमसी पाणी देण्याचा आदेश दिला  होता. या निर्णयाचा गोव्यावर परिणाम होणार असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून  व्यक्‍त करण्यात आली होती. त्यानुसार लवादाच्या या निर्णयाला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी मागणी काँग्रेस तसेच म्हादई बचाव अभियानतर्फे केली जात आहे.  

कणकुंबी येथील रामेश्‍वर मंदिर परिसरात कळसा आणि मलप्रभा नद्यांचा उगम होत असून माऊली मंदिराच्या परिसरातून येणारी ही कळसा नदी आंब्याचो व्हाळमधून गोव्याच्या म्हादई अभयारण्यात प्रवेश करते. परंतु यंदाच्या उन्हाळ्यात कर्नाटकाने मातीचा भराव  टाकून उभा केलेला बांध गोव्याच्या आक्षेपानंतर हटवला असला तरी पावसाळ्यात कळसा नैसर्गिक प्रवाह गतिमान झाला नाही. याबाबत गोव्याच्या पथकाने पाहणी केली असता भिंतीद्वारे बंद केलेल्या कळसाच्या कालव्याला हेतुपुरस्सर पोकळी ठेवल्याने सदर पाणी भुयारी कालव्यातून मलप्रभा पात्रात जात असल्याचे दिसून आले होते.

कर्नाटकाने म्हादई बचाव अभियान व लवादाच्या आदेशाचे कसलेच पालन केलेले नाही.कर्नाटकाने घटनाबाह्य रितीने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवले आहे, असे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी सांगितले.