Fri, Apr 26, 2019 20:08होमपेज › Goa › त्रिपुरात ड्युटीवर जाण्यास ‘जीएपी’जवान नाखूश 

त्रिपुरात ड्युटीवर जाण्यास ‘जीएपी’जवान नाखूश 

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:52PMमडगाव : प्रतिनिधी

गोवा सशस्त्र पोलिस दलातील 90 जवानांना त्रिपुरा, नागालँड, मेघालय भागात निवडणूक काळातील बंदोबस्तासाठी पाठवले जात असून 24 जानेवारी रोजी कूच करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

आधुनिक शस्त्रे, बचावासाठी बुलेटप्रूफ जॅकेट तसेच नक्षलवादी हल्ल्याचा प्रतिकार करण्याचे प्रशिक्षणदेखील नसलेल्या या जवानांना नक्षली कारवायांसाठी कुप्रसिद्ध  भागात पाठवले जात असून यापूर्वी बॉम्ब हल्ल्यात एक  गोमंतकीय जवान जखमी होण्याची घटना घडली होती. त्याची दखल न घेता पुन्हा या जवानांना त्याच भागात पाठवण्याची तयारी सुरू झाल्याने पोलिस दलात हा चर्चेचा विषय बनला आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी वरील तिन्ही राज्यांत निवडणुका होणार आहेत.एरव्ही पोलिसांना निवडणुकीला दहा ते बारा दिवस बाकी असताना दुसर्‍या राज्यात पाठवले जाते, मात्र यावेळी दीड महिना बाकी असताना सुमारे 90 जणांना वरील भागात बंदोबस्तासाठी पाठवण्याची तयारी सरकारने सुरू केल्याने पोलिसांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

‘काश्मीरला पाठवल्यास निभाव कसा लागेल?’ 

जीएपीच्या एक अधिकार्‍याने ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, उद्या आम्हाला काश्मीरमध्ये ड्युटीसाठी पाठवले तर तिथे आमचा टिकाव लागणार नाही. त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमच्याजवळ तशा बंदुका नाहीत आणि इतर बंदुकांचे आम्हाला प्रशिक्षण नाही.त्रिपुरा, नागालँड, मेघालय यासारख्या राज्यांत ड्युटी बजावण्यासाठी येथील जवानांकडे बुलेटप्रूफ जॅकेट तरी कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

शेजारच्या राज्यात ड्युटीचा जवानांशी करार

सरकारबरोबर झालेल्या जवानांच्या करारात या जवानांना शेजारच्या राज्यात ड्युटी बजावावी लागेल, असे स्पष्ट केले होते, त्यानुसार महाराष्ट्र किंवा कर्नाटक सारख्या शेजारच्या राज्यात ड्युटी बजावण्यासाठी पाठवावे पण ज्या राज्यात आता दीड महिन्यासाठी त्यांना पाठवले जात आहे त्याला आमचा आक्षेप असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आयआरबीच्या जवानालासुद्धा हाच नियम आहे, ते केवळ शेजारच्या राज्यात जाऊन ड्युटी बजावतात. मात्र केंद्रीय राखीव दलाला कोणत्याही राज्यात जाऊन ड्युटी बजावावी लागते, असे काही पोलिसांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.