Thu, Apr 25, 2019 06:20होमपेज › Goa › ‘दिव्यांग’ना पेन्शन देणारे गोवा पहिले  राज्य

‘दिव्यांग’ना पेन्शन देणारे गोवा पहिले  राज्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

अखिल भारतामध्ये ‘दिव्यांग’ लोकांना पेन्शन सुविधा पुरविणारे गोवा हे पहिले राज्य आहे . तर दिव्यांग अधिकार कायदा लागू (आरपीडी अ‍ॅक्ट) करणारे भारतातील दुसरे राज्य आहे, अशी माहिती मुख्य दिव्यांग आयुक्‍त डॉ. कमलेशकुमार पांडे यांनी दिली.

मुख्य दिव्यांग आयुक्‍त आणि राज्य आयुक्‍त यांनी संयुक्‍त विद्यमाने दक्षिण गोव्यातील दिव्यांगासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी संकुलात आयोजित मोबाईल न्यायालय सुनावणीवेळी डॉ. पांडे बोलत होते.  यावेळी केंद्र उपआयुक्‍त राकेशकुमार राव, राज्य आयुक्त अनुराधा जोशी व राज्य समाज कल्याण संचालनालयाचे संचालक एस. व्ही. नाईक उपस्थित होते. 

पांडे  म्हणाले, की संपूर्ण देशात गोवा राज्यातच दिव्यांगाना दर महिना 2000 ते 3500 पर्यंत पेन्शन दिली जाते. गोवा सरकारने गेल्या  दि. 19 नोव्हेंबर 2017  रोजी  आरपीडी कायदा लागू केला असून हा कायदा लागू करणारे भारतातील हे दुसरे राज्य आहे. हा कायदा  लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे. हळूहळू संपूर्ण भारतात हा कायदा लागू होणार आहे. मोबाईल न्यायालयात अठरा वर्षांवरील 91 लोकांनी आपल्या तक्रारी डॉ. पांडे यांच्या समोर मांडल्या, त्यानुसार सुनावणी झाली व सर्वांच्या समस्या सोडविल्या.

काहींचे कार्यालय आपल्या घरापासून दूर होते, तर काहींना कामाच्या ठिकाणी शौचालय, पार्किंग जागा, सर्टिफिकेशन नाही आदी समस्या होती. काही समस्या सल्ल्याने सुटल्या तर काही समस्या सोडण्यासाठी राज्य आयोगाला सूचना देण्यात आल्याचे डॉ पांडे यांनी सांगितले. दिव्यांगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी  जिल्हा व  तालुका पातळीवरही मोबाईल न्यायालयाद्वारे सुनावणी घेण्याची सूचनाही त्यांनी दिली. बहिर्‍यांना ऐकण्याचे यंत्र लवकरच देण्यात येणार आहे. याशिवाय स्किल इंडिया संकल्पने अंतर्गत दिव्यांगाचा सर्वपरीने विकास करणे, दिव्यांगाना भारतभर ओळख पत्र मिळण्यासाठी केंद्र सरकारने (युडीआयडी) जागतिक ओळख पत्र देण्यास सुरवात झाल्याचे पांडे  यांनी  दिली.