Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Goa › गोवा : औद्योगिक कामगारांची व्यवस्थापनांकडून सतावणूक

गोवा : औद्योगिक कामगारांची व्यवस्थापनांकडून सतावणूक

Published On: Feb 28 2018 12:04AM | Last Updated: Feb 27 2018 11:52PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणार्‍या कामगारांची व्यवस्थापनांकडून  सतावणूक केली जाते. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा कामगारांच्या हक्‍कांसाठी राज्यव्यापी रोटी बचाव आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गोवा कामगार महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अजितसिंह राणे यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 

 कामगार आयुक्‍त कार्यालयातील अधिकारीदेखील कामगारांना न्याय देण्याऐवजी विविध आस्थापनांच्या व्यवस्थापनांना झुकते माप देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राणे पुढे म्हणाले की, कुंडई येथील बर्जर पेंट कंपनीतील कामगार किशोर गावडे यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या सतावणुकीला कंटाळून आपले जीवन संपवले. अशाचप्रकारे राज्यातील विविध औद्योगिक आस्थापनांतील कामगारांची व्यवस्थापनांकडून   सतावणूक केली जाते. मात्र त्याकडे सरकार डोळेझाक करीत आहेत. कंपनीमध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांचा पगार नियमितपणे  वाढतो. मात्र कामगारांना नियमित पगारवाढ देण्यास टाळाटाळ केली जाते. त्याचबरोबर अचानकपणे कामावरुन कमी करणे, मेमो जारी करणे, सेवेतून निलंबित करणे आदी प्रकारे कामगारांची सतावणूक व्यवस्थापनाकडून केली जाते. कामगारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीही दिली जात नाही. 

औद्योगिक वसाहतींमध्ये 80 टक्के नोकर्‍या गोमंतकीयांना देण्यात येतील, असे आश्‍वासन सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात 20 ते  25 टक्केच गोमंतकीय या उद्योगांमध्ये काम करतात, असे राणे म्हणाले.

कामगारांना न्याय देण्यासाठी  सरकारने न्यायिक आयोगाची स्थापना करावी तसेच कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जलद न्यायालयाची स्थापना करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामगार  युनियनला संबंधित कंपनीने मान्यता द्यावी, कामगारांच्या मागण्यांवर  सहा महिन्यांत तोडगा काढावा व या  मागण्या सरकारने 45 दिवसांत पूर्ण कराव्यात. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा  इशारा राणे यांनी दिला.

कामगार नेत्या स्वाती केरकर, कामगार आनंद शिरोडकर, भानुदास नाईक, कल्पेश वंसकर व अन्य यावेळी उपस्थित होते.