Sun, Mar 24, 2019 17:32होमपेज › Goa › गोवा : एफडीए संचालिकेला अटक करा

गोवा : एफडीए संचालिकेला अटक करा

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 22 2018 12:20AMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनयुक्‍त मासळीप्रकरणी  अन्‍न व औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी करून आगशी पोलिस स्थानकात काँग्रेस पक्षाने तक्रार दाखल केली असल्याची माहिती माजी आमदार आग्‍नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. फार्मेलिन प्रकरणात  गुंतलेल्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ, असा  इशाराही त्यांनी दिला. 

फर्नांडिस म्हणाले, फार्मेलिनयुक्‍त मासळीचा विषय समोर येताच   सरकारने परराज्यातील मासळी गोव्यात आणण्यावर बंदी घातली. मात्र, तरीही बाजारात ही मासळी येत आहे. मासळीचे ट्रक परत पाठवण्यात आल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.  प्रत्यक्षात  ही मासळी जप्‍त करून ती नष्ट करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता ती केवळ माघारी पाठवण्यात आली, हे असे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

रसायनांचा वापर करून फळे पिकवण्यात येत असल्याचा संशय आल्यास ती जप्‍त करून नष्ट केली जातात. मग मासळी का नाही, फार्मेलिनमुळे कर्करोगाचा धोका अधिक आहे. त्यामुळे सरकारने  मासळी खाणार्‍यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याचेही फनार्र्ंडिस यांनी सांगितले.

ज्योती सरदेसाई यांच्या विरोधात  तक्रार दाखल करणारे काँग्रेसचे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके म्हणाले, अन्‍न व औषध  प्रशासनातर्फे  12 जुलै रोजी   राज्यभरातील मासळी बाजारांमध्ये छापे मारुन जप्‍त केलेल्या मासळीत फार्मेलिन असल्याचे  तपासणीत समोर आल्याचे संचालिका सरदेसाई यांनी सांगितले होते. मात्र, काही वेळानंतर  प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर या मासळीत मर्यादित प्रमाणात फार्मेलिन असून मासळीत त्याचा अंश असतोच. त्यामुळे मासळीचे सेवन केले जाऊ शकते, असे विधान केले. अशी दोन वेगवेगळी विधाने त्यांनी का केली. यावरून  अहवालात फेरफार झाल्याचे स्पष्ट होते. दिशाभूल करणारी विधाने करून सरदेसाई यांनी जनतेचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे सरदेसाई यांच्यावर एफआयआर नोंदवून त्यांना सेवेतून निलंबित करावे, अशी मागणीही  भिके यांनी केली. 

प्रसाद आमोणकर व शंकर फडते यावेळी उपस्थित होते.