Sat, Nov 17, 2018 04:28होमपेज › Goa › गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक

गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

गोवा विद्यापीठ कॅम्पस परिसरातील हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना विद्यापीठाचा  कार्यकारी अभियंता अमित श्रीवास्तव याला भ्रष्टाचारविरोधी पथकाने  (एसीबी)  गुरुवारी  रंगेहाथ  पकडून अटक केली.
एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅनोरमा  एंटरप्राईजच्या मालकीण हेमा सुंदर रेड्डी यांनी गोवा विद्यापीठ कॅम्पस परिसरातील हाऊस किपिंगचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा सादर केली होती. त्यानुसार त्यांना वार्षिक 50 लाख 584 रुपयांचे कंत्राट  जुलै 2017 पासून प्राप्‍त  झाले होते.  संशयित कार्यकारी अभियंता श्रीवास्तव यांनी रेड्डी यांच्याकडे कंत्राटानुसार मिळणार्‍या दरमहा बिलाच्या रकमेपैकी 5 टक्के  रक्‍कम    लाच म्हणून द्यावी, अशी मागणी केली होती. यासाठी संशयित श्रीवास्तव यांनी जुलै 2017 पासून तगादा लावला होता. अखेर  या  संदर्भात तडजोड करुन ती रक्कम  50 हजार रुपये इतकी करण्यात आली होती. संशयित श्रीवास्तव  विरोधात  रेड्डी  यांच्यावतीने गोपी पेकेत यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एसीबीने गुरुवारी दोनापावला येथील ओशियन पार्क निवासी संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ  सापळा रचला.

तक्रारदार गोपी पेकेत हा त्याठिकाणी 50 हजार रुपयांची रक्कम लाच म्हणून देण्यासाठी घेऊन गेला.  संशयित श्रीवास्तव याला एसीबीच्या पथकाने पेकेत यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक  केली.श्रीवास्तवविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.   एसीबीच्या अधीक्षक प्रियांका कश्पय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक फ्रान्सिस कॉर्त पुढील तपास करीत आहेत. 

Tags : Goa, Goa University, executive engineer, arrested, accepting, bribe